जम्मू-काश्मीरमधील अपघातात 35 जणांचा मृत्यू; दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:09 PM2019-07-01T13:09:31+5:302019-07-01T13:49:26+5:30
अपघातात 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. किश्तवाडमध्ये झालेला अपघात हृदयद्रावक असल्याचं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं मोदी म्हणाले. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुनावणी व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी एका बसला अपघात झाला. यामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
The accident in Jammu and Kashmir's Kishtwar is heart-wrenching. We mourn all those who lost their lives and express condolences to the bereaved families. May the injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2019
किश्तवाडमधील भीषण अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील दु:ख व्यक्त केलं. किश्तवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानीची माहिती मिळताच दु:ख झालं. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो, असं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदी, शहांसोबतच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील मृतांना श्रद्धांजली वाहिली.