केकेआरचे खेळाडू कोरोनाबाधित, सामना पुढे ढकलला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:25 AM2021-05-04T00:25:01+5:302021-05-04T00:25:25+5:30
आयपीएलला धोका नाही : सीएसके स्टाफलाही कोरोनाची लागण ; कोटलाचे कर्मचारी पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : बायोबबल भेदून कोरोनाने आयपीएलमध्येही थैमान घातले. कोलकाता नाईट रायडर्स संघातील फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कडक नियमावलीनंतरही खेळाडूंच्या गोटात झालेला कोरोनाचा शिरकाव पाहता, सोमवारी खेळला जाणारा केकेआर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. ३० मे पर्यंत आयपीएल चालणार असून, या दरम्यान हा सामना खेळविण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, मागच्या चार दिवसात तिसऱ्या चाचणीत वरुण आणि संदीप यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. अन्य सदस्य मात्र निगेटिव्ह आहेत. बीसीसीआयने आयपीएल सुरू राहील, असे वारंवार ठासून सांगितले. मात्र, सोमवारी केकेआर संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याने लीगवर संकट ओढवले. वरुण आणि संदीप यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून, अन्य खेळाडूंना वेगळे ठेवण्यात आले आहे. दोघेही ३० वर्षांचे आहेत. संदीपला सातपैकी एकाही सामन्यात केकेआरने अद्याप संधी दिलेली नाही. वैद्यकीय पथक दोघांवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, केकेआरचे खेळाडू दररोज कोरोना चाचणी देणार असून, यातून संभाव्य पॉझिटिव्ह प्रकरणे पुढे येऊ शकतील. आयपीएलने दिलेल्या
माहितीनुसार,‘वरुण आणि संदीप यांचे नमुने पॉझिटिव्ह येण्याआधी ४८ तास या दोघांच्या सहवासात आलेल्या खेळाडूंची ओळख पटविली जाईल.’ केकेआरने अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अहमदाबाद येथे खेळला होता. सहा ठिकाणी प्रेक्षकांविना आणि बायोबबलमध्ये सामन्यांचे आयोजन होऊनही खेळाडू कोरोनाबाधित होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
स्वत:चे नाव गुप्त राखण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, अहमदाबाद येथे असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील प्रत्येक खेळाडूची चाचणी केली जाईल. वरुण आणि संदीप यांच्या संपर्कात असलेल्यांची ॲपद्वारे ओळख पटविली जाईल. आयपीएलच्या एसओपीनुसार, संक्रमितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सहा दिवस विलगीकरणात ठेवले जाईल. यादरम्यान पहिल्या, तिसऱ्या तसेच सहाव्या दिवशी त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह यायला हवा. आयपीएल सुरू होण्याआधीदेखील अक्षर पटेल, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल हे पॉझिटिव्ह आढळले होते. स्पर्धेदरम्यान खेळाडू किंवा स्टाफ पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिली वेळ आहे.
आयपीएल रद्द करणे कठीणच!
देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना आयपीएल रद्द होणे मात्र कठीण मानले जात आहे. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, विश्व क्रिकेटची आर्थिक उलाढाल जवळपास १५ हजार कोटींची आहे. यातील ३३ टक्के रक्कम आयपीएलमधून येते. केवळ आयपीएलमधून विश्व क्रिकेटला पाच हजार कोटी मिळतात. २०१९ला आयपीएलचे ब्रॅन्ड मूल्य जवळपास ४७ कोटी रुपये इतके होते. यंदा आयपीएलमधून बीसीसीआयला तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ होण्याची आशा आहे
खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान नाही
मेलबोर्न : सीए प्रमुख निक हॉकले यांनी आयपीएल आटोपल्यानंतर मायदेशी परतण्यास इच्छुक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान पाठविण्याची कुठलीही योजना नसल्याचे सोमवारी सांगितले. हॉकले म्हणाले,‘ आमचे खेळाडू आयपीएल बायोबबलमध्ये सुरक्षित आहेत.’ मुंबई इंडियन्सचा फलंदाज ख्रिस लीन याने आयपीएलनंतर खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारने मात्र ही मागणी आधीच फेटाळली.
कमिन्सला होती माहिती!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने आयपीएलमधील सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याची माहिती दिली होती. चक्रवर्थी गुरुवारच्या सामन्यानंतर खांद्यावर स्कॅन करण्यासाठी इस्पितळात गेला होता. त्यातच तो पॉझिटिव्ह आढळला. त्याने सर्व सातही सामने खेळले असून, सात गडी बाद केले आहेत.
सीएसके तंबूतही शिरकाव
सीएसकेचे सीईओ काशी विश्वानाथन, गोलंदाजी कोच लक्ष्मीपती बालाजी आणि स्टाफमधील अन्य एका सदस्य रविवारी पॉझिटिव्ह आढळला होता. बीसीसीआयने याबाबत खुलासा करताना या चाचण्या पुन्हा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कर्मचारी पॉझिटिव्ह
नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावरील काही मैदान कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. या मैदानावर मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला जाणार आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी मात्र पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये मैदानाची जबाबदारी असलेला एकही कर्मचारी नाही, असे स्पष्ट केले.
सीएने दिली ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत
मेलबॉर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनावर मात करण्यासाठी भारताला ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत जाहीर केली. याशिवाय आपले खेळाडू आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने अधिक रक्कम उभारण्याचेदेखील
अश्वासन दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारतासोबत असल्याचे सीएने म्हटले आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजन, औषधे आणि लसीकरणासाठी आर्थिक सहकार्य हवे आहे. भारताच्या या आवाहनाला ऑस्ट्रेलियन लोकांनी सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहनदेखीेल सीएने केले.