मोदींना जंगल सफारी घडवणारी व्यक्ती आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:16 PM2019-07-29T16:16:02+5:302019-07-29T16:16:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना डिस्कव्हरीवरच्या मॅन व्हेर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. मोदी जंगल सफारीवर येणार असल्याची माहिती बेअर ग्रिल्सनेच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बेअरच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery, तर Bear Grylls हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.
मोदींबरोबर दिसणाऱ्या या बेअरचा आतापर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. ट्विट करत तो म्हणाला, ‘जगभरातील 180 देशांच्या जनतेला मोदींची या आधी कधीही उजेडात न आलेली बाजू दिसेल. प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मोदी जंगल सफारीत आपल्याला पाहायला मिळतील. मोदींसोबतचा मॅन व्हेर्सेस वाइल्ड हा कार्यक्रम डिस्कव्हरी इंडियावर 12 ऑगस्ट रोजी 9 वाजता पाहण्याचं त्यानं आवाहन केलं आहे. ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’ हा शो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जंगलातून कशा प्रकारे आपल प्रवास करू शकतो हे या कार्यक्रमात दाखवण्यात आलं आहे. या कार्यक्रमात साप, विंचू, मगरींचा जिवंत थरार अनुभवास मिळतो. बेअर ग्रिल्सच्या जीवघेण्या कसरतींमुळेच या कार्यक्रमात एक प्रकारचा थरार दिसतो.
कोण आहे बेअर गिल्स ?
बेअर वयाच्या 23व्या वर्षी पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आला. 1998 रोजी त्यानं जगातील सर्वात उंच शिखर असलेलं माऊंट एव्हरेस्ट सर केला असून, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनंही त्याची नोंद घेतली होती. 90 दिवसांमध्ये तो एव्हरेस्ट शिखरवर चढला होता. एडव्हर्ड मिशेल ग्रिल्स हे बेअरचे खरे नाव असून, त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला ‘बेअर’ हे टोपण नाव दिले होते. बेअरने कराटेचे धडे गिरवले असून, त्याच्याकडे कराटेमधील ब्लॅक बेल्ट आहे. बेअर तीन वर्ष ब्रिटिश स्पेशल एअर सर्व्हिसमधील ‘एसएएस 21’ दलात कार्यरत होता. बेअरने लिहिलेल्या ‘फेसिंग अप’ या पहिल्याच पुस्तकाला वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
2012ला बेअरने ‘मड, स्वेट ऍण्ड टीअर्स : द ऑटोबायोग्राफी’ या नावाने आत्मचरित्र लिहिलं. त्यानंतर 2006 साली त्याला ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम ‘डिस्कव्हरी’ने जगभरातल्या 200 देशांत दाखवला. 2006 ते 2011 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये ‘मॅन व्हेर्सेस वाइल्ड’चे सात सिझन प्रदर्शित करण्यात आले. सर्व भागांमध्ये बेअरच नैसर्गिक परिस्थितींशी दोन हात करताना दिसला. बेअर विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. जेसी, मार्माड्युके आणि हकलबेरी अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.