मस्तच! टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या बिलापासून मुक्तता होणार; आता 160 चॅनेल मोफत मिळणार, जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:01 PM2021-04-01T18:01:31+5:302021-04-01T18:07:03+5:30
Free TV Channels : काहीजण वर्षांतून एकदा तर काही दर महिन्याला न चुकता टीव्हीचा रिचार्ज करतात. मात्र आता या रिचार्जपासून सुटका करून घ्यायची असेल तर एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
नवी दिल्ली - ग्राहकांना दर महिना घरी टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स रिचार्ज करावा लागतो. काहीजण वर्षांतून एकदा तर काही दर महिन्याला न चुकता टीव्हीचा रिचार्ज करतात. मात्र आता या रिचार्जपासून सुटका करून घ्यायची असेल तर एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्राहकांनी सरकारी डीटीएच बॉक्सचा आधार घेता येणार आहे. ज्यामध्ये त्यांना कधीही रिचार्ज करावा लागणार नाही आणि कायमच मोफत टीव्ही चॅनेल पाहता येणार आहेत.
प्रसार भारतीच्या डीडी फ्री डिशद्वारे ग्राहकांना रिचार्जपासून मुक्तता मिळू शकते. प्रसार भारतीचा सेट टॉप लावल्यानंतरही तुम्हाला 160 वाहिन्या पाहण्याची संधी मिळणार आहे. या सेट टॉप बॉक्ससाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील आणि आपण स्वस्तात कसा याचा फायदा उचलू शकतो याची सर्व माहिती जाणून घेऊया...
डीडी फ्री डिश म्हणजे काय?
डीडी फ्री डिश प्रसार भारतीद्वारा संचालित डीटीएच सेवा आहे. डिसेंबर 2004 मध्ये ही लाँच केली गेली. यामध्ये ग्राहकाला सेट टॉप बॉक्सचा सेट मिळेल, ज्यासाठी आपल्याला एकदा पैसे द्यावे लागतील. एकदा तुम्ही पैसे दिल्यावर तुम्हाला त्याची सुविधा आयुष्यभर मिळते आणि तुम्हाला दरमहा किंवा वर्षाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
किती चॅनेल आहेत?
प्रसार भारतीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना यामध्ये 15 सामान्य करमणूक चॅनेल, 15 मूव्ही चॅनेल, 23 रिजनल चॅनेल, 51 एज्युकेशनल चॅनेल, 24 न्यूज चॅनेल, 6 म्युझिक चॅनेल, 3 भक्ती चॅनेल, 3 आंतरराष्ट्रीय चॅनेल पाहायला मिळतील. याद्वारे आपण थेट क्रिकेट, सुपरहिट गाणी, चित्रपट इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
एकाच वेळी किती रुपये द्यावे लागतील?
जर तुम्हाला डीडी फ्री डिश मिळवायची असेल तर एक वेळ सेट खरेदी करावा लागेल. आपण बाजारात कोठूनही डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स आणि डिश खरेदी करू शकता. या संपूर्ण सेटसाठी तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. फक्त हा आपला एक वेळचा खर्च असेल आणि त्यानंतर आपल्याला दरमहिना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
कुठेही घेऊन जाता येणार?
ग्राहकांनी जर कोणत्याही कारणास्तव आपलं घर बदलल्यास ते हा बॉक्स इतरत्र सहजपणे इन्स्टॉल करू शकतात. यासाठी कोणत्याही इन्स्टॉलरच्या मदतीने आपण एका घरापासून दुसर्या घरात शिफ्ट करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.