वंदे भारत नाही, शताब्दी नाही, दुरंतोही नाही! ‘या’ ५ ट्रेनमधून भारतीय रेल्वे करते बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:11 PM2023-10-11T20:11:55+5:302023-10-11T20:14:54+5:30
Indian Railway: या ट्रेन भारतीय रेल्वेच्या कामधेनू, धनलक्ष्मी आहेत, असे म्हटले जाते.
Indian Railway: आताच्या घडीला भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस सर्वांत लोकप्रिय आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ आहे. आता स्लीपर वंदे भारत, साधारण वंदे भारत ट्रेन येणार आहेत. देशभरात लाखो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेच्या विविध सेवांमधून प्रवास करत असतात. विविध प्रकारच्या मेल-एक्स्प्रेस, शताब्दी, दुरंतो, राजधानी, हमसफर, जनशताब्दी, अंत्योदय, तेजस, डबलडेकर यातून प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, ५ अशा ट्रेन आहेत, ज्यातून भारतीय रेल्वेची सर्वाधिक कमाई होते, असे म्हटले जाते.
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक सुखकर आणि जलद प्रवासासाठी ट्रेन प्रवासाला पसंती देतात. भारतीय रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की, लोकांना त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींची नीट माहिती नसते. भारतात दररोज सुमारे २२,५९३ ट्रेन धावतात. त्यापैकी १३,४५२ प्रवासी ट्रेन आहेत. प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त भारतीय रेल्वेकडे ९,१४१ मालगाड्या आहेत. रेल्वेचे हे नेटवर्क देशभरात ६७,३६८ किमीपर्यंत पसरले आहे. भारतात रात्रंदिवस धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आहेत आणि यातील काही गाड्या प्रचंड कमाई करून देत असल्याने रेल्वेसाठी त्या महत्त्वाच्या आहेत. भारतीय रेल्वेच्या पाच सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या ट्रेन कोणत्या? पाहुया...
भारतीय रेल्वेच्या ५ बक्कळ कमाई करून देणाऱ्या ट्रेन पुढीलप्रमाणे:
- बंगळूरु राजधानी एक्स्प्रेस: सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेनमध्ये बंगळूरु राजधानी एक्स्प्रेसचे नाव घेतले जाते. उत्तर रेल्वेची ही सर्वांत फायदेशीर ट्रेन आहे. या ट्रेनने २०२२- २३ मध्ये १७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- सियालदाह राजधानी एक्सप्रेस: ही नवी दिल्ली ते पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सियालदाहपर्यंत धावते. २०२२-२३ मध्ये या रेल्वेने एकूण १,२८,८१,६९,२७४ रुपये इतकी कमाई केली आहे.
- दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेस: नवी दिल्ली आणि दिब्रुगडदरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने २०२२-२३ मध्ये एकूण १,२६,२९,०९,६९७ रुपयांची कमाई केली आहे.
- मुंबई राजधानी एक्स्प्रेस: नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ या वर्षात रेल्वेला १,२२,८४,५१,५५४ रुपये कमावले.
- दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस (मोराणहाट मार्गे): नवी दिल्ली ते दिब्रुगड या मार्गावर आणखी एक राजधानी एक्स्प्रेस चालवली जाते. मात्र ही राजधानी मोराणहाट मार्गे जाचे. या राजधानी एक्स्प्रेसने एक वर्षात रेल्वेला एकूण १, १६,८८,३९,७६९ रुपये मिळवून दिले आहेत.