अजित डोवाल यांचे 'खास', ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास... जाणून घ्या ऋषी कुमार शुक्लांबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 07:25 PM2019-02-02T19:25:03+5:302019-02-02T19:26:54+5:30
ऋषी कुमार शुक्ला हे 1983 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे. त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी. टेक केलं. ते सध्या मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक होते.
नवी दिल्ली - वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची आज सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीनं आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे निकटवर्तीय म्हणून शुक्ला ओळखले जातात. सीबीआयचे प्रमुख झालेले मध्य प्रदेश केडरचे ते पहिलेच आयपीएस अधिकारी ठरले आहेत. सध्याचे 'रॉ'चे प्रमुख अनिल धसमाना हेही मध्य प्रदेश केडरचेच आहेत.
ऋषी कुमार शुक्ला हे 1983 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे. त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी. टेक केलं. ते सध्या मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. कमलनाथ सरकारने चार दिवसांपूर्वीच त्यांना पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे म्हणून नियुक्त केलं होतं. आता दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक म्हणून त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
ऋषी कुमार शुक्ला यांनी अजित डोवाल यांच्यासोबत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम केलं आहे. तेव्हापासून त्यांची चांगलीच दोस्ती असल्याचं बोललं जातं. शुक्ला हे टेनिसचे चाहते आहेत आणि स्वतःही टेनिस खेळतात. ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा दांडगा अभ्यास असल्याचं समजतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीच्या बैठकीत शनिवारी सीबीआयच्या नवीन संचालकांची घोषणा करण्यात आली. ऋषीकुमार शुक्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास असलेले सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे निकटवर्तीय मानले जाते.
आलोक वर्मा यांच्या बदलीनंतर, १० जानेवारीपासून सीबीआयचं संचालकपद रिक्त होतं. नागेश्वर राव हे प्रभारी संचालक म्हणून काम पाहत होते. सीबीआय संचालकाच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यात न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे दोन सदस्य होते. सुमारे १२ ते १८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर या समितीने विचार केला. त्यात गुजरातचे डीजीपी शिवानंद झा, बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा, सीआयएसएफचे महासंचालक राजेश रंजन, एनआयएचे डीजी वाय सी मोदी यांची नावं शर्यतीत पुढे असल्याचं बोललं जात होतं. परंतु, निवड समितीनं ऋषी कुमार शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.