शारदा घोटाळ्यामुळे मोदी-ममतांमध्ये तेढ; जाणून घ्या प्रकरणाबद्दल ए टू झेड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 08:48 AM2019-02-04T08:48:14+5:302019-02-04T09:44:23+5:30
शारदा घोटाळ्यावरुन पश्चिम बंगालमध्ये वादळ; मोदी आणि दिदी आमनेसामने
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम काल कोलकात्यात पोहोचली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर पश्चिम बंगालमध्ये रणकंदन सुरू झालं.
शारदा चिट फंड घोटाळ्यामुळे मोदी विरुद्ध दिदी हा वाद सुरू झाला. 2500 कोटींचा हा घोटाळा 2013 मध्ये उघडकीस आला. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये रोज व्हॅली स्कीममध्येही घोटाळा झाला आहे. हादेखील चिट फंड घोटाळा असून तो जवळपास 17000 कोटींचा आहे. या दोन्ही घोटाळ्यामागे तृणमूलच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचे धागेदोरे समोर आले आहेत. या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणात सीबीआयनं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांच्या विरोधात 11 जानेवारीला आरोपपत्र दाखल केलं.
मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे पडली वादाची ठिणगी? https://t.co/VkLgelIXmb#MamataVsCBI#MamataBlocksCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
रोज व्हॅली ग्रुप चिट फंड घोटाळ्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरुन तृणमूलचे खासदार सुदीप बंडोपाध्याय आणि तापस पॉल सीबीआयच्या अटकेत आहेत. रोज व्हॅलीचे अध्यक्ष गौतम कुंदू आणि अन्य तिघांनी देशभरातील गुंतवणूकदारांच्या 17 हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. तर शारदाचे चेअरमन सुदीप्त सेन यांच्यावर चिट फंडमधून आलेल्या पैशांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे.
केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : मोदी-ममतांमध्ये आर-पारची लढाई; कोलकात्यात रात्रभर धरणं आंदोलन https://t.co/fYUWfKYK0u#MamataVsCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
शारदा आणि रोज व्हॅली चिट फंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. गुंतवणूकदारांना प्रॉपर्टी देण्याचं किंवा परदेश यात्रा घडवण्याचं आश्वासन या कंपन्यांनी दिलं. त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक केली. मात्र ज्यावेळी या ठेवी परत करण्याची वेळ आली, तेव्हा कंपन्यांनी हात वर केले. या कंपन्यांनी आपली कार्यालयं बंद केली. त्यामुळे अनेकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. 2008 ते 2012 या काळात शारदा समूहाच्या चार कंपन्यांनी विविध पॉलिसींच्या माध्यमातून 2459 कोटी रुपये जमा केल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती.