लस घेतल्यानंतर पंतप्रधान काय म्हणाले, परिचारीका पी. निवेदिता यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:57 AM2021-03-01T11:57:26+5:302021-03-01T11:59:23+5:30
Pm Narendra Modi Vaccination : परिचारीका पी. निवेदिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली लस
आजपासून म्हणजेच १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, लस दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा त्यांना लस देणाऱ्या परिचारीका पी. निवेदिता यांनी केला.
"सरांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस त्यांना २८ दिवसांनी देण्यात येईल. त्यांना लस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्ही मूळच्या कोणत्या ठिकाणाहून आहात असा प्रश्नही केला. तसंच यानंतर प्रतिक्रिया देताना लस दिलीसुद्धा हेदेखील मला समजलं नाही (लगा भी दिये, पका भी नहीं चला)," असंही ते म्हणाल्याचे पी. निवेदिता यांनी डी.डी. न्यूजशी बोलताना सांगितलं.
गेल्या तीन वर्षांपासून आपण एम्समध्ये कार्यरत आहोत आणि सध्या कोरोना लसीकरण केंद्रात काम करत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लसीकरणासाठी आल्याचं समजलं. त्यांना लस देण्यासाठी मला बोलावलं तेव्हा ते पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यांना भेटून खुप आनंद झाला. त्यांनी आमच्याशी संवादही साधला. त्यांना आता पुढील डोस २८ दिवसांनी देण्यात येणार असल्याचंही पी निवेदिता यांनी सांगितलं.
पी निवेदिता या मूळच्या पुडुचेरीच्या रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस देताना त्यांच्यासोबत केरळच्या मूळ रहिवासी असलेल्या परिचारीका रोसम्मा अनिल यादेखील होत्या. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं आणि अर्धा तास त्या ठिकाणी थांबलेही होते.
काय म्हणाले मोदी?
"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.