'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 10:46 AM2019-08-30T10:46:57+5:302019-08-30T10:47:37+5:30
हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे.
अहमदाबाद - पाण्याच्या आतमधून हल्ला करण्याची क्षमता ठेवणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो गुजरातच्या कच्छ खाडीतून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गुजरातच्या समुद्रकिनारी हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरामी नाला क्रिकमधून पाकिस्तानचे सशस्त्र कमांडो भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्यासाठी दहशतीचं षडयंत्र रचत आहे. यासाठी पाकिस्तानने हरामी नाला या नव्या मार्गाची निवड केली आहे. कुठे आहे हा हरामी नाला? आणि का आहे गुजरातवर निशाणा? जाणून घेऊया.
'हरामी नाला' गुजरातच्या कच्छ परिसराला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला वेगळे करणारा 22 किमीचा मोठा समुद्रीमार्ग आहे. या दोन्ही देशांमध्ये हरामी नाला क्रिक परिसरातील 96 किलोमीटर जागा सीमावादात अडकली आहे. 22 किमी हरामी नाला हा घुसखोर आणि तस्करांसाठी स्वर्गासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तस्करांचे राज्य आहे. त्याचमुळे याचं नाव हरामी नाला असं ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि पातळी हवामानानुसार वारंवार बदलत राहत असते. त्यामुळे ही जागा भयंकर धोकादायक आहे.
2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मच्छिमारांची नौका कुबेरला याच हरामी नालातून जप्त केली होती. त्यानंतर गुजरातमार्गे मुंबईत प्रवेश करून 26/11 हल्ला घडवून आणला होता. हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र याठिकाणी झिंगा मासे, रेड सैमेन मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना मोठी मागणीदेखील आहे. याच कारणासाठी हरामी नाला भारत आणि पाकिस्तानमधील मच्छिमारांसाठी आवडीचं ठिकाण आहे.
कांडला पोर्ट, मुद्रा पोर्ट याठिकाणची सुरक्षा केंद्रीय गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रशिक्षित कमांडो याच हरामी नाल्याचा वापर करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी माहिती दिली होती की, जैश-ए-मोहम्मदने स्वत:ची समुद्री विंग बनविली आहे. यात दहशतवाद्यांना पाण्याच्या आतमध्ये हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हरामी नालाच्या माध्यमातून भारतात दहशत पसरविण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.