Bhaiyuji Maharaj: जाणून घ्या कोण होते भय्यू महाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 03:08 PM2018-06-12T15:08:31+5:302018-06-12T15:08:31+5:30
राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे.
मुंबई- भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख होतं. इंदूरमधील बापट भागात त्यांचं आश्रम आहे. तेथूनच ते सामाजित कार्याचं संचालन करायचे. भय्यू महाराज यांची प्रत्येत क्षेत्रात ओळख होती. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल तसंच अनेक सिने कलाकार त्यांच्या आश्रमात जायचे. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे.
अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना तत्कालीन सरकराने भय्यू महाराज यांना अण्णांचं उपोषण सोडविण्यासाठी पाठवलं होतं. भय्यू महाराज यांच्या हातून ज्यूस पिऊन अण्णानी उपोषण सोडलं. त्यानंतर भय्यू महाराज माध्यमांच्या नजरेत आले. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी सद्भवना उपोषणला बसले होते. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं होतं.
भय्युजी महाराज यांनी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल विशेष चिंता व्यक्त केली होती. गुरुदक्षिणा म्हणून ते वृक्षारोपण करायचे. आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडांची लागवड केली होती. देवास आणि धार जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक तळ्यांच्या खोदकामासाठी मदत केली होती. नारळ, शाल, फुले अशाप्रकारची भेट देण्याऐवजी त्यासाठी लागणारा पैसा शिक्षणासाठी खर्च केला जावा असं त्यांचं मत होतं. त्यांनी स्थापन केलेला ट्रस्ट 10 हजार मुलांना स्कॉलरशिप देतो. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीसाठी जनजागृती अभियान चालवण्यासाठी एक विशेष समिती स्थापण्यात आली होती. या समितीमध्ये नर्मदानंद, हरिहरानंद, कॉम्प्यूटर बाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. या पाचही जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण, जल संरक्षण आणि स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यासाठी ही विशेष समिती तयार करण्यात आली आहे.
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्यावतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.
भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकारी जखमी झाले होते.