कोची मेट्रोकडे आदर्श प्रकल्प म्हणून पाहिले जाईल- पंतप्रधान
By admin | Published: June 17, 2017 07:06 PM2017-06-17T19:06:18+5:302017-06-17T19:06:18+5:30
शनिवारी कोची येथील कलूर आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
ऑनलाइन लोकमत,
कोची, दि.17- कोची मेट्रो प्रकल्प हा आदर्श नागरी आणि कार्बनचे शून्य उत्सर्जन करणारा प्रकल्प म्हणून नावाजला जाईल अशा शब्दांमध्ये या प्रकल्पाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची मेट्रोच्या उदघाटनप्रसंगी केले. शनिवारी कोची येथील कलूर आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आपल्या सरकारने "मेक इन इंडिया"मध्ये नागरी पायाभूत सुविधा, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळेस सांगितले. यावेळेस पंतप्रधानांनी मेट्रोमधून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल पी. सथसिवम, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत प्रवास केला.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "कोची ही अरबी समुद्राची राणी आणि मसाल्याचे मोठे केंद्र आहे. आता हे शहर केरळची व्यापार राजधानी म्हणून ओळखले जाते. केरळमध्ये येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत कोचीचा पहिला क्रमांक लागतो, त्यामुळे या शहरात मेट्रोची व्यवस्था असणे गरजेचे होते. या शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, 2021 पर्यंत कोचीची लोकसंख्या 23 लाखांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरी पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो आवश्यक होती. मेट्रोमुळे कोचीची आर्थिक वृद्धीही होणार आहे." पंतप्रधान मोदी यांनी या मेट्रोच्या उदघाटनाच्या भाषणामध्ये मेक इन इंडियाकडेही लक्ष वेधले. कोची मेट्रोमध्ये मेक इन इंडियाचे प्रतिबिंब झळकते असे सांगत ते म्हणाले, " चेन्नईजवळील कारखान्यामध्ये फ्रेंच कंपनी अलस्टोम कंपनीने मेट्रोचे कोच तयार केले असून त्यातील 70 टक्के भाग हे भारतातच बनवले गेले आहेत." मेट्रोला लागणाऱ्या ऊर्जेपैकी 25 टक्के ऊर्जा सौरऊर्जेपासून मिळणार असल्याचे सांगत भविष्यात संपुर्ण प्रकल्प अपारंपारिक ऊर्जेपासून चालवला जाईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांनी केरळला भेट दिल्याबद्दल आणि मेट्रो प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. विकासकामे वेगाने पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारबरोबर एकत्र काम करु असेही विजयन यांनी यावेळेस स्पष्ट केले.
कोची मेट्रोबद्दल- कोची मेट्रो हा भारतातील सर्वात वेगाने पूर्ण झालेला प्रकल्प आहे. रस्ते, रेल्वे आणि जल अशा तिन्ही मार्गांना जोडलेला हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. याच्या पहिल्या टप्प्यासाठी 51.81 दशलक्ष रुपये खर्च झाले आहेत. 2012 साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. कोची मेट्रोच्या प्रत्येक चौथ्या खांबावर व्हर्टिकल गार्डन उभारण्यात आले आहे.