कोहिनूर हिरा ब्रिटनने लुटून नेलेला नाही, तर भेट दिला!

By admin | Published: April 19, 2016 04:31 AM2016-04-19T04:31:43+5:302016-04-19T04:31:43+5:30

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे.

Kohinoor diamond is not captured by Britain, gifted! | कोहिनूर हिरा ब्रिटनने लुटून नेलेला नाही, तर भेट दिला!

कोहिनूर हिरा ब्रिटनने लुटून नेलेला नाही, तर भेट दिला!

Next

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी ब्रिटनकडे करू शकत नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.
सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंह ठाकूर व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे हे निवेदन करताना सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी सांगितले की, मी ही सांस्कृतिक मंत्रालयाची भूमिका सांगत आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर त्यांची भूमिका अद्याप कळविलेली नाही.
रणजीत कुमार म्हणाले की, शिखांबरोबर झालेल्या युद्धांत ब्रिटिशांनी पंजाब काबीज केल्यानंतर पंजाबचे तत्कालीन शासक महाराजा रणजीत सिंग यांनी कोहिनूर हिरा ईस्टइंडिया कंपनीला भेटीदाखल दिला होता. पुढे १८५०मध्ये पंजाबचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो ‘नजराणा’ म्हणून नेऊन दिला.
कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत मिळविण्यासाठी पावले उचलण्यास केंद्र सरकारला सांगावे, अशी विनंती करणारी ‘आॅल इंडिया ह्युमन राईट््स अ‍ॅण्ड सोशल जस्टिस फ्रंट’ने केलेली जनहित याचिका न्यायालयापुढे आहे. हा हिरा ब्रिटनकडे परत मागण्यात अडचणी येतील, असे वाटत असेल तर सरकारने त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने ९ एप्रिल रोजी सांगितले होते.
त्यावर सॉलिसिटर जनरलनी वरीलप्रमाणे निवेदन केल्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला सहा आठवड्यांत नेमकी भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले.
१०५ कॅरेट वजनाचा व सुमारे २०० दशलक्ष डॉलर किमतीचा कोहिनूर एकेकाळी जगातील सर्वांत मोठा हिरा मानला जात असे. भारतातून ब्रिटनला नेल्यावर हा हिरा ब्रिटनच्या शाही मुकुटात बसविला गेला. महाराणी व्हिक्टोरिया यांनी राज्याभिषेकाच्या वेळी कोहिनूर हिरा बसविलेला तो राजमुकुट परिधान केला. सध्या हा हिरा लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
—————————-
ब्रिटनचा ठाम विरोध
भारत सरकारने कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत आणावा ही मागणी फार जुनी आहे. अनेकांनी त्याची सांगड राष्ट्रीय अस्मितेशीही घातली. परंतु ब्रिटनने मात्र तो हिरा परत करण्यास ठाम नकार दिला आहे. १९७६मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जिम कॅलेघन यांनी ब्रिटिश व शिखांमध्ये झालेल्या शांतता कराराचा दाखला देत सर्वप्रथम नकार देताना म्हटले की, ‘मी हा हिरा (भारताला) परत करण्याचा सल्ला सम्राज्ञीला देणार नाही.’ सन २००३मध्ये हाच सूर कायम ठेवत तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले होते, ‘ही एक मागणी मान्य केली तर अशाने संपूर्ण ब्रिटिश म्युझियम कालांतराने ओस पडेल!’

Web Title: Kohinoor diamond is not captured by Britain, gifted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.