‘कोहिनूर’चे भारतात परतणे अशक्यच!
By admin | Published: April 11, 2016 02:27 AM2016-04-11T02:27:44+5:302016-04-11T02:27:44+5:30
एकेकाळी भारताची शान असलेला कोहिनूर हिरा भारतात परत आणणे अशक्य असल्याची हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने ४३ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा अडसर समोर केला आहे
नवी दिल्ली : एकेकाळी भारताची शान असलेला कोहिनूर हिरा भारतात परत आणणे अशक्य असल्याची हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने ४३ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा अडसर समोर केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हा हिरा इंग्लंडच्या महाराणीला भेट देण्यात आला होता.
प्राचीन वस्तू आणि कला खजिना कायदा १९७२ च्या तरतुदीनुसार केवळ बेकायदेशीररीत्या देशाबाहेर निर्यात केलेल्या प्राचीन वस्तूंबाबत पुरातत्त्व विभाग विचार करू शकतो. स्वातंत्र्यापूर्वीच कोहिनूर देशाबाहेर नेण्यात आल्यामुळे पुरातत्त्व विभागाला या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे उत्तर सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर दिले आहे.
कोहिनूरला मायदेशी परत आणण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, अशी विचारणा करणारा अर्ज विदेश मंत्रालयाकडे देण्यात आला होता. ब्रिटनला पाठविण्यात आलेले पत्र आणि त्या देशाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतही सादर करण्याची मागणीही अर्जदाराने केली होती.