कोहलीच्या जेवढ्या धावा तेवढा डिस्काऊंट; ग्राहकांना फक्त ७ रुपयांत मिळाली बिर्याणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:09 IST2023-11-03T12:08:20+5:302023-11-03T12:09:42+5:30
धावसंख्येएवढा डिस्काऊंट बिर्याणीवर देऊन सर्वाचं लक्ष वेधलं.

कोहलीच्या जेवढ्या धावा तेवढा डिस्काऊंट; ग्राहकांना फक्त ७ रुपयांत मिळाली बिर्याणी
लखनौ - टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेतील सलग ७ व्या विजयाची नोंद केली. त्यामुळे, भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असून टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकाची दावेदार मानली जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयश अय्यर यांनी धडाकेबाजी खेळी केली. या तिघांनीही शतकाच्या उंबरठ्यावर येऊन विकेट दिली. मात्र, तिघांच्या फलंदाजीमुळेच भारताने ३५७ धावांचा डोंगर उभारला होता. त्यात, विराट कोहलीने ८८ धावा केल्या. विराटच्या एका चाहत्याने त्याच्या धावसंख्येएवढा डिस्काऊंट बिर्याणीवर देऊन सर्वाचं लक्ष वेधलं.
मुजफ्फरनगर येथील एका नॉनव्हेज बिर्याणीचालकाने चक्क विराट कोहलीने केलेल्या ८८ धावांएवढा म्हणजेच बिर्याणी प्लेटवर ८८ टक्के डिस्काऊंट देऊ केला. ६० रुपयांची प्लेट केवळ ७ रुपयात विक्री करुन विराटच्या चाहत्याने आपलं क्रिकेटवरील विराट प्रेम दाखवून दिलं. मुजफ्फरनगरच्या मेरठ रोडवरील मकबूल बिर्याणीवाल्या हॉटेल चालकाने चिकन बिर्याणीवर विशेष ऑफर देत ८८ टक्के डिस्काऊंट दिला.
मकबूल बिर्याणी चालकाने आपल्या दुकानाबाहेर एक बॅनरही झळकवला आहे. ''मकबूल बिर्याणीची विराट कोहली फॅन ऑफर'' असा आशय लिहून त्याने बिर्याणीवरील दरात ८८ टक्के सूट दिली. कारण, विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ८८ धावा केल्या होत्या, म्हणून चाहत्यांनी असं दमदार सेलिब्रेशन केलं आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना कुठल्याही देशासोबत असू दे, आमच्याकडील ही ऑफर सुरुच राहणार आहे. विराट कोहलीने डबल सेंच्युरी करावी, मग आम्ही लोकांना २-२ प्लेट बिर्याणी मोफत देऊ असेही हॉटेल चालक मोहमद दानिश यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान १८८ लोकांनी बिर्याणी खाण्यासाठी नोंदणी केली.