कोहलीचे फिटनेस आव्हान पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:51 AM2018-05-25T01:51:23+5:302018-05-25T01:51:23+5:30
क्रीडामंत्री राठोड यांचा फंडा; आपण फिट, तर इंडिया फिट
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजला देशभरातून खूपच प्रतिसाद मिळत असून, ते आव्हान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्वीकारून पूर्ण तर केलेच, पण त्याने ते आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताच, आपण ते स्वीकारत असून, आपल्या फिटनेसचा व्हिडीओ आपण लवकरच प्रसारित करू, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.
हृतिक रोशननेही सायकलवरून आपण रोज कसा व्यायाम करतो, हे सांगताना त्याचा फोटोही प्रसारित केला. विराटने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर पत्नी अनुष्का शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही फिटनेस आव्हान दिले आहे.
ंपंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी टिष्ट्वट करून, 'विराट कोहली, मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे. मी माझा फिटनेस चॅलेंज व्हिडीओ लवकरच शेअर करेन', असे म्हटले आहे. विराटच्या आव्हानाचे अनुष्का शर्मा व महेंद्रसिंग धोनी यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री यांचे आव्हान स्वीकारताना विराट याने 'मिस्टर राठोड मी तुमचं चॅलेंज स्वीकारत आहे', असे म्हणून एक्सरसाइज करण्यास सुरुवात केली. त्यात कोहली स्पायडर प्लँक करताना दिसत आहे.
सारेच लागले
व्यायामाला
त्याआधी राठोड यांनी आपला एक व्हिडीओ टिष्ट्वटरवर शेअर केला होता. त्यात ते आपल्या कार्यालयात पुशअप्स मारताना दिसत आहेत. ‘आपण फिट तर इंडिया फिट' अशी घोषणा त्यांनी दिली असून, तंदुरुस्त राहण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या त्यांच्या आव्हानांचा उद्देश आहे. त्यांच्या या आव्हानानंतर अनेकांनी आपले व्यायामाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.