मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 19:34 IST2024-11-18T19:33:41+5:302024-11-18T19:34:22+5:30
मणिपूर सरकारने सोमवारी आढावा घेतल्यानंतर राज्यातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा २० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
मणिपूरमधील हिंसाचार आणि निदर्शने अजूनही थांबलेली नाहीत. जिरीबाममध्ये तीन महिला आणि तीन मुलांची हत्या झाल्यानंतर इंफाळ खोऱ्यात मोठा गोंधळ उडाला आहे. सोमवारी, मणिपूर इंटिग्रिटीवरील समन्वय समितीने कर्फ्यूचे उल्लंघन करत इंफाळ पश्चिम जिल्ह्यात निषेध केला. या काळात शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. तर मणिपूर सरकारने राज्यातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बुधवारपर्यंत स्थगित केली आहे.
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आंदोलकांनी लामफेलपत येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. यानंतर कार्यालयाच्या मुख्य गेटला साखळीने कुलूप लावले. याशिवाय आंदोलकांनी टाकील येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यालयाचे दरवाजे आणि अर्थशास्त्र व सांख्यिकी संचालनालयाच्या गेटलाही टाळे ठोकले. संशयितांवर जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.
कोकोमी संघटना 'कुकी जो हमर' उग्रवाद्यांवर लष्करी कारवाईची मागणी करत आहे. इंफाळच्या खवैरामबंद बाजारात गेल्या तीन दिवसांपासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामील झालेले लायमयम सुरजकांता म्हणाले, "जिरीबाममध्ये कुकी जो हमर उग्रवाद्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची केलेली क्रूर हत्या आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारने कारवाई करावी. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी."
मणिपूर इंटिग्रिटीवरील समन्वय समिती ही मेईतेई समुदायाची संघटना आहे. इम्फाळ खोऱ्यात या वांशिक गटाचे प्राबल्य आहे. इंफाळ खोऱ्यात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
११ नोव्हेंबर रोजी रोझी साहा मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका कॅम्पमधून बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर शुक्रवारी जिरी नदीजवळ तीन जणांचे मृतदेह आढळून आले. आसाममधील कछार जिल्ह्यातील बराक नदीत रविवारी आणखी दोन मृतदेह सापडले. हे मृतदेह बेपत्ता लोकांचे मानले जातात. आसामच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत एकूण पाच मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, सुरक्षा दल आणि शस्त्रधारी यांच्यातील चकमकीत १० कुकी तरुणांनाही आपला जीव गमवावा लागत आहे.