कोल्हापूरची तिजोरी भाजप-ताराराणीकडे; 'स्थायी'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 12:29 PM2018-02-12T12:29:56+5:302018-02-12T12:50:03+5:30
विरोधकांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची मते फोडली.
कोल्हापूर: महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. याठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटातील दोन नगरसेवकांना फोडत स्थायी समितीचे अध्यक्षपद जिंकले.
राष्ट्रवादीच्या मेघा पाटील आणि ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे या दोघांमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी थेट लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ पाहता मेघा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, विरोधकांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची मते फोडली. ही मते आशिष ढवळे यांना मिळाली. त्यामुळे ढवळे यांनी मेघा पाटील यांचा निसटता पराभव केला.
तत्त्पूर्वी रविवारी राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील भाजपचे गटनेते, ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह भाजपचे नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शरद पवार रविवारी कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये थांबले होते. खा. महाडिक साडेआठच्या सुमारास त्यांना भेटायला आले. त्यावेळी पवार यांनी आपल्या घरी चहापानास जायचं असे सांगताच महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे यांच्यासह भाजपचा मित्रपक्ष असलेला ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, विरोधी पक्ष नेते किरण शिराळे, राजसिंह शेळके व शेखर कुसाळे तेथे हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भेटीचा आणि स्थायी समिती सभापतीपदाच्या निकालांचा काही संबंध आहे का, याबद्दलची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.