परी येऊन वाचवेल, वेब सीरिज पाहून 12 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल; इमारतीवरून मारली उडी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:34 PM2022-02-08T20:34:56+5:302022-02-08T20:47:26+5:30
वेब सीरिजच्या वेडापायी एका 12 वर्षीय मुलाने आपला जीव गमावला आहे.
नवी दिल्ली - मुलांमध्ये सध्या वेब सीरिजची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. पण याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेब सीरिजच्या वेडापायी एका 12 वर्षीय मुलाने आपला जीव गमावला आहे. कोलकातामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. मुलगा एक जपानी वेब सीरिज पाहत होता आणि यातूनच त्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. इमारतीवरून उडी मारल्यावर एखादी परी येऊन आपल्याला वाचवेल असं मुलाला वाटतं होतं आणि म्हणूनच त्याने उडी मारल्याचं म्हटलं जात आहे.
वेब सीरिज प्लॅटिनम एंडमध्ये असाच चमत्कार दाखवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानी वेब सीरिज एका काल्पनिक गोष्टीवर आधारित आहे. ज्यामध्ये हिरो इमारतीवरून उडी मारतो. त्यानंतर परी येऊन त्याला वाचवते. मग हिरोमध्ये चमत्कारीक शक्ती निर्माण करतो. हेच पाहून मुलाने देखील असं टोकाचं पाऊल उचललं आहे. पार्क सर्कसच्या फूल बागान परिसरात कॅनाल सर्कुलर रोडवरील हाय अँड हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये 11 मजली इमारतीखाली एक 12 वर्षांचा मुलगा पडला होता.
बिराज पचीसिया असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या घरात सरस्वती पूजन सुरू होतं. त्याच्या कुटुंबातील सदस्य या पूजेत व्यस्त होते. तेव्हा तो इमारतीच्या छतावर गेला आणि त्याने उडी मारली. पोलिसांनी सांगितलं की या मुलाला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल देण्यात आला होता. प्राथमिक तपासात मुलाला वेब सीरिज पाहण्याचं व्यसन होतं. यामुळेच त्याने असं धक्कादायक पाऊल उचललं, हे स्पष्ट झालं आहे.
मुलाने एक जपानी वेब सीरिज पाहिल्याची माहिती सर्वांनीच दिली आहे. मुलानेही त्या हिरोसारखी 11 मजली इमारतीवरून उडी मारली आणि तो जमिनीवर कोसळला. घटनेवेळी तिथं उपस्थित असलेले लोक तिथं धावत आले. उपचारासाठी तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.