Sandip Ghosh : कोलकातामध्ये ३ फ्लॅट, पत्नीच्या नावावर २ घरं; संदीप घोषकडे कोट्यवधींचं घबाड, किती आहे संपत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:36 AM2024-09-11T10:36:04+5:302024-09-11T10:46:28+5:30
Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : आरजी कर कॉलेजचे माजी प्रिन्सिपल डॉ. संदीप घोष याच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे.
कोलकाता येथील आरजी कर कॉलेजचे माजी प्रिन्सिपल डॉ. संदीप घोष याच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. कोलकाता प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या ईडीने सांगितलं की, झडतीदरम्यान संदीप घोषच्या घरातून अनेक मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. ज्यावरून त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं दिसून आलं. ईडीच्या म्हणण्यानुसार, कोलकाता येथील पॉश भागात एक-दोन नव्हे तर तीन आलिशान फ्लॅट आहेत.
मुर्शिदाबादमध्ये एक फ्लॅट नावावर आहे. इतकंच नाही तर संदीप घोषच्या पत्नीच्या नावावर कोलकाता येथे दोन फ्लॅट आणि एक फार्महाऊस आहे. ईडी आरजी कर कॉलेजमधील भ्रष्टाचाराची चौकशी करत आहे. तपास यंत्रणेनुसार संदीपच्या घरावर छापा टाकला असता कोट्यवधींच्या संपत्तीचे पुरावे मिळाले. मिळालेल्या पुराव्यांवरून या मालमत्तांची खरेदी भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून झाल्याचं स्पष्ट होते.
झडतीदरम्यान संगीता घोषने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेता दोन मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संदीप घोष आणि पत्नी संगीता घोष यांच्या मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील मागवला आहे. तपासात अनेक ठिकाणी घरं असल्याचं समोर आलं आहे. येत्या काही दिवसांत ईडी संगीता घोषला चौकशीसाठी बोलावू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सीबीआयने संदीप घोषच्या बेलेघाटा येथील घराची झडती घेतली होती. संदीपविरोधात अनेक तक्रारी तपास यंत्रणेकडे आल्या आहेत. २०२२-२३ मध्ये ८४ एमबीबीएस हाऊस स्टाफची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आल्याचा दावाही सीबीआयने केला आहे. रिक्रूटमेंट कमेटीच्या मान्यतेशिवाय लोकांची भरती करण्यात आली. संदीप घोषने परवाना नसताना ३ कंपन्यांना टेंडर दिलं. त्या बदल्यात त्याने प्रचंड कमिशन वसूल केलं. या आरोपांमुळे संदीप घोषला अटक करण्यात आली आहे.