Kolkata Doctor Case : हत्येला आत्महत्या म्हणणारे 'प्राचार्य'! डॉक्टरांवर भ्रष्टाचाराचे आरोप; दबदबा इतका की...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 03:37 PM2024-08-17T15:37:25+5:302024-08-17T15:38:47+5:30
kolkata doctor news : महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे.
Kolkata Doctor Murder Case : कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. हे प्रकरण तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता संतापजनक विधान केल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ. घोष हे कोलकाता येथील त्याच आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते, जिथे ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. खरे तर घोष यांची ताकद आणि त्यांचा दबदबा सर्वकाही सांगून जातो. (kolkata murder case full story)
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती. गळा दाबला गेला, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून डोळ्यात घुसला. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (kolkata murder case doctor) विशेष बाब म्हणजे असे असताना देखील संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे रुग्णालयाने मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना सांगितले. आत्महत्येचे कारण खुद्द डॉक्टर घोष यांनी दिल्याचा आरोप आहे. (kolkata murder case girl) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉ. घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले, पण ते गेले नाहीत. अखेर १६ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. (kolkata murder case full story in marathi)
दरम्यान, डॉ. संदीप घोष हे यापूर्वी कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते सर्जन आणि ऑर्थोपेडिक्सचे प्राचार्य आहेत. 'दैनिक भास्कर'ने डॉ. घोष यांच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधला असता धक्कादायक माहिती समोर आली. घोष यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी घेरलेच नाही, तर त्यांचा इतका दबदबा होता की, दोनदा बदली होऊनही त्यांना कोणी पदावरून हटवू शकले नाही. प्राचार्य बनलेल्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक सोळावा होता, पण रातोरात ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले, त्यामुळे नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
विद्यार्थ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
नीटमध्ये टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलाचा NEET मध्ये २९९ वा क्रमांक होता. भौतिकशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांमध्ये तो दुसरा होता. आम्ही एका छोट्या गावात राहतो. पण, मुलगा एक मोठे स्वप्न पाहून कोलकाता सारख्या मोठ्या शहरात आला होता. संदीप घोष प्राचार्य होईपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. पण त्यांच्या आगमनानंतर कॉलेजचे वातावरण अचानक बदलले. त्यांनी अनेक मुलांना त्रास दिला आहे. त्यांच्या भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल कोणी काही बोलले तर त्यांना लक्ष्य केले जात असे. घोष यांच्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट काम करत असायचा. हा गट अनेक विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करत असे. माझ्या मुलाला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास, ग्रंथालयात किंवा सभागृहात जाण्यास बंदी घातली होती. माझ्या मुलाला व्यायामशाळेत, इतर रूममध्ये किंवा वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. माझ्या मुलाला अनेकदा नापास केले गेले. अनेकवेळा निलंबनाची कारवाई केली... याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता.
आर. जी. कार मेडिकल कॉलेजच्या एका माजी प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर संदीप घोष यांच्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य नियुक्तीसाठी यादी तयार करण्यात आली होती. त्या यादीत संदीप घोष हे १६व्या क्रमांकावर होते. एकूण चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. पण, रातोरात संदीप घोष १६व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आले. त्यांना आर. जी. कार हॉस्पिटल मिळाले. यामागे त्यांची राजकीय ताकद होती. संदीप यांच्याकडे सगळी सूत्रे देऊन पैसे वसूल करण्याचा मुख्य हेतू होता. नियुक्ती झाल्यानंतर संदीप यांनी चुकीची कामे करण्यास सुरुवात केली. लक्षणीय बाब म्हणजे दोन वेळा बदली (३१ मे २०२३ आणि ११ सप्टेंबर २०२३) होऊनही संदीप घोष यांनी आपली खुर्ची सोडली नाही. तसेच संदीप घोष यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाकडून कॉलेजमध्ये वसूलीचे काम सुरू होते.
संदीप घोष यांच्या गटाने केला बचाव
संदीप घोष यांच्यावर नाना प्रकारचे आरोप असले तरी काही विद्यार्थ्यांनी किंबहुना त्यांच्या गटाने त्यांचा बचाव केला. संदीप घोष आणि काही विद्यार्थ्यांची नावे जबरदस्तीने घेतली जात आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. संदीप घोष यांच्या विरोधात आंदोलने झाली आहेत, पण ते एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्यांच्या विरोधात आंदोलने ही काही मोठी गोष्ट नाही. काही प्राध्यापकांनाही डॉ.घोष यांच्या समस्या आहेत. त्यामुळेच ते आता बदला घेत आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
डॉ. संदीप घोष यांचा दबदबा
३१ मे २०२३ रोजी पश्चिम बंगाल सरकारने डॉ. संदीप घोष यांच्या जागी डॉ. सनथ घोष यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती केली होती. पण, २४ तासात हा आदेश मागे घेण्यात आला.
११ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ. घोष यांना मुर्शिदाबाद येथे ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी पुन्हा रुजू करण्यात आले.
२०२३ मध्ये संदीप घोष यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, यावेळीही आरोग्य सचिवांना आदेश मागे घ्यावे लागले.