डॉक्टरच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काय केलं? आरजी कर मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्याला CBI चे 4 प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:51 PM2024-08-19T16:51:18+5:302024-08-19T16:53:37+5:30
पीडितेच्या आई-वडिलांना तीन तास का वाट बघावी लागली...?
कोलकात्यातील डॉक्टरवरील कथित बलात्कार आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरा दिला आहे. यातच, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात CBI च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सलग चौथ्या दिवशी आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी केली. रुग्णालयात तैनात महिला डॉक्टरसोबत कथित बलात्कार आणि हत्येच्या तपासासंदर्भात घोष यांची चौकशी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती देत म्हटले आहे की, घोष सोमवारी सकाळच्या सुमारास सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयात पोहोचले होते.
आरजी कर मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्यांना CBI चे 4 प्रश्न -
1. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर, त्यांची भूमिका काय होती? असा प्रश्न घोष यांना विचारण्यात आला.
2. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कुणासोबत संपर्क साधला?
3. पीडितेच्या आई-वडिलांना तीन तास का वाट बघावी लागली?
4. घटनेनंतर रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीतील सेमिनार हॉलजवळील खोल्यांच्या दुरुस्तीचा आदेश कुणी दिला होता?
सीबीआय अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून गेले तीन दिवस घोष यांच्यासोबत काही तास चौकशी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी घोष यांच्या मोबाईल फोनची 'कॉल लिस्ट', तसेच त्याच्या व्हॉट्सॲप 'चॅट लिस्ट'चीही तपासणी करत आहेत.
घोष यांनी व्यक्त केली आहे हल्ल्याची भीती -
महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ऑर्थोपेडिक तज्ज्ञ घोष यांनी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानी हल्ल्याची भीतीही व्यक्त केली होती, यानंतर त्याच्या वकिलाने कोलकाता उच्च न्यायालयात संरक्षण मागितले होते.
यानंतर, न्यायालयाने त्यांना एकल खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश दिले होते. पीजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. यानंतर, पोलिसांनी दुसऱ्या दिवशी एकाला अटक केली होती.