निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 05:54 AM2024-08-19T05:54:32+5:302024-08-19T06:31:51+5:30

Kolkata doctor rape and murder : कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निघृण हत्येमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Kolkata doctor rape and murder : hearing of the Kolkata case in the Supreme Court on Tuesday | निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी

निर्घृण अत्याचाराची ‘सर्वोच्च’ दखल, कोलकाता प्रकरणाची सुप्रीम काेर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली/कोलकाता : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि निर्घृण हत्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट रोजी ठेवली 
आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याप्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

२० ऑगस्टच्या सुनावणी प्रकरणांच्या यादीनुसार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात मंगळवारी कोलकातातील प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  कनिष्ठ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निघृण हत्येमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

ओळख उघड, ६० जणांना समन्स
 पीडित महिला डॉक्टरची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या माजी खासदार लॉकेट चटर्जी व दोन प्रसिद्ध डॉक्टरांसह ६० जणांना समन्स पाठवले आहे. 
 गृहमंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कायदा व सुव्यस्थेसंदर्भात दर दोन तासांनी अहवाल पाठवण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने महिला डॉक्टरांना रात्रपाळीचे काम न देण्याचे निर्देश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना व रुग्णालयांना दिले आहेत.

सीबीआयला मानवी अवयव तस्करीचा संशय
या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) चौकशी सुरू केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर येत आहे. मानवी अवयवांची तस्करीचा भंडाफोड होऊ नये म्हणून महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शंका सीबीआयने व्यक्त केली आहे. सीबीआयने दोन दिवसांत १९ लोकांची चौकशी केली. पीडित डॉक्टरच्या वर्गमित्रांची व इतर लोकांची चौकशी केल्यानंतर यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी या रुग्णालयात मानवी अवयवांच्या तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची माहिती सीबीआयला दिली. सीबीआय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे कॉल डिटेल व चॅटची माहिती एकत्र करत आहे.

Web Title: Kolkata doctor rape and murder : hearing of the Kolkata case in the Supreme Court on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.