"मी विद्यार्थ्यांविरोधात..."; बंगाल प्रोटेस्टसंदर्भातील वक्तव्यावर CM ममता यांचं स्पष्टिकरण, काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:49 PM2024-08-29T14:49:14+5:302024-08-29T14:49:58+5:30
ममता बॅनर्जी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे...
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल महाविद्यालयात झालेल्या ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी, न्यायाची मागणी करत सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनासंदर्भात बोलताना, एक एफआयआर त्यांचे भविष्य उध्वस्त करू शकते, असे CM ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर, विरोधकांनी ममतांना निशाण्यावर घेतले आहे. ममता बॅनर्जी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर आता, ममता बॅनर्जी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिले आहे.
आता काय म्हणाल्या ममता -
आपल्या भाषणासंदर्भात स्पष्टीकरण देताना, ममता यांनी सोशल मीडियावर लिहिले, "मला काही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये दुर्भावनापूर्ण प्रचाराची माहिती मिळाली, जे काल मी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणासंदर्भात पसरवले गेले. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, मी (वैद्यकीय इ.) विद्यार्थ्यांच्या अथवा त्यांच्या आंदोलनाविरुद्ध एक शब्दही बोललेले नाही. त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचे आंदोलन सत्य आहे. काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्याप्रमाणे मी त्यांना कधीही धमकी दिली नाही. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "मी भाजप विरोधात बोलले आहे. मी त्यांच्या विरोधात बोलले, कारण ते केंद्र सरकारच्या मदतीने आमच्या राज्यातील लोकशाही धोक्यात आणत आहेत. ते राज्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात मी भाष्य केले आहे."
"मी हेही स्पष्ट करू इच्छिते की, मी काल माझ्या भाषणात जी वापरली, ती श्री रामकृष्ण परमहंस देव यांची ओळ आहे. ते म्हणाले होते, कधी कधी आवाज उठवावा लागतो. गुन्हे, गुन्हेगारी घटना घडतात तेव्हा विरोधी आवाज बुलंद करावाच लागतो. मी त्याच संदर्भात विधान केले होते," असेही ममता म्हणाल्या.