पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालांना स्नेहभोजनाला बोलावले अन्...गेटच बंद करून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:09 PM2019-12-05T16:09:50+5:302019-12-05T16:10:20+5:30
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भोजनाचे निमंत्रण देऊन ऐनवेळी रद्द करत विधानसभेची दारेच बंद केल्याने राज्यपालांवर धरणे आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या. तसेच केंद्रीय तपास संस्थांची राज्यातील कारवाईची परवानगीच त्यांनी काढून घेतली होती. तर लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहांच्या रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप झाला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर आज वेगळाच मानापमानाचा ड्रामा समोर आला आहे.
झाले असे की विधानसभा अध्यक्षांनी राज्यपाल जगदीप धनखड़ यांना गुरुवारी विधानसभेमध्ये स्नेहभोजनासाठी बोलावले होते. मात्र, ऐनवेळीच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. जेव्हा राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले तेव्हा त्यांना गेट बंद दिसले. यामुळे त्यांनी दुसऱ्या गेटने विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गेटवर त्यांना काही काळ उघडण्याची वाटही पहावी लागली. नंतर पहिल्या गेटनेच ते आत गेले.
हा अपमान पाहून नाराज झालेल्या राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये अशी लोकशाही चालणार नाही. हा माझा अपमान आहे. राज्यात अनेकदा माझा अपमान करण्यात आला आहे आणि हा एक कट आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता लगावला. तसेच विधानसभेचे गेट बंद असल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यपालांनी विधानसभेत पोहोचल्यावर सांगितले की, जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा महनीय व्यक्तींसाठीच्या गेटवर आलो तेव्हा गेट बंद दिसले. मला इथे या ऐतिहासिक इमारतीला पहायचे होते. लायब्ररीला भेट द्यायची होती. विधानसभा स्थिगित केली याचा अर्थ असा नाही की सभागृहही बंद करावे. पूर्ण सचिवालय सुरू असायला हवे होते.
खरे राजकारण राज्यपालांच्या पत्रावरून सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यानी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पत्र लिहिले की, मी उद्या विधानसभेतील सुविधांची पाहणी करण्यासाठी येत आहे. तसेच लायब्ररीमध्येही जाणार आहे. त्याच्या आधीच म्हणजे मंगळवारी राज्यपालांनी तृणमूल काँग्रेसला टोला लगावताना म्हटले होते की, मी संविधानाचे पालन करतोय याचा अर्थ रबर स्टँम्प नाही.