फ्लिपकार्टवर तक्रारीसाठी फोन केला अन् तो भाजपाचा सदस्य झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 10:50 PM2018-06-26T22:50:15+5:302018-06-26T22:52:50+5:30
फ्लिपकार्टकडून आलेल्या बॉक्सवर भाजपाचा क्रमांक
कोलकाता: सध्या देशासह जगभरात फिफा वर्ल्ड कपचा ज्वर पाहायला मिळतो आहे. फुटबॉलचे अनेक सामने रात्री उशिरापर्यंत असतात. या सामन्यांचा कुटुंबीयांना होऊ नये, यासाठी कोलकात्यामधील एका फुटबॉल चाहत्यानं फ्लिपकार्टवरुन हेडफोन मागवले होते. रात्री फुटबॉल सामने पाहताना घरच्यांची झोपमोड होऊ नये, असा विचार या फुटबॉल चाहत्यानं केला होता. मात्र फ्लिपकार्टनं हेडफोनच्या जागी चक्क तेलाची बाटली पाठवली. याची तक्रार करण्यासाठी फ्लिपकार्टला फोन करताच समोरुन फुटबॉल चाहत्याला भाजपा प्रवेशाचा मेसेज आला.
रात्री उशिरापर्यंत रंगणारे फुटबॉल सामने पाहण्यासाठी एका फुटबॉल चाहत्यानं दोन हेडफोन मागवले होते. मात्र फ्लिपकार्टनं पाठवलेलं पार्सल उघडताच त्यामध्ये फुटबॉल चाहत्याला तेलाची बाटली मिळाली. यानंतर त्यानं फ्लिपकार्टनं पाठवलेल्या पार्सलच्या बॉक्सवर असलेल्या फोन नंबरवर कॉल केला. एक रिंग वाजताच हा फोन कट झाला. यानंतर दुसऱ्यांदा फोन करण्याआधी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मेसेजच्या सुरुवातीला 'वेलकम टू बीजेपी' असं लिहिलं होतं. या मेसेजमध्ये पुढे प्राथमिक सदस्यात्वाचा क्रमांकदेखील देण्यात आला होता.
यामुळे वैतागलेल्या फुटबॉल चाहत्यानं दुसऱ्यांदा त्याच नंबरवर कॉल केला. तेव्हाही त्याला तोच मेसेज आला. यानंतर त्यानं त्याच्या मित्रांनाही त्याच नंबरवर कॉल करण्यास सांगितलं. त्यांनाही तोच मेसेज आला. या सर्व प्रकरणानंतर फ्लिपकार्टच्या बॉक्सवर छापण्यात आलेला नंबर भाजपाचा असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांना फ्लिपकार्टच्या क्रमांक मिळाला. याबद्दल पश्चिम बंगाल भाजपाला विचारल्यावर, आमचा आणि फ्लिपकार्टचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी फ्लिपकार्टला संपर्क साधला असता, हा नंबर आम्ही तीन महिन्यांपूर्वी सरेंडर केल्याचं त्यांनी सांगितलं. तो क्रमांक बॉक्सला लावण्यात आलेल्या चिकटपट्टीवर छापण्यात आला होता, त्यामुळे हा गोंधळ झाल्याचं कंपनीनं सांगितलं.