कोलकातामध्ये 'मिनी पाकिस्तान', तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या वक्तव्यारुन वाद
By admin | Published: April 30, 2016 09:45 AM2016-04-30T09:45:22+5:302016-04-30T09:45:22+5:30
तृणमूल काँग्रसचे पश्चिम बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी गार्डन रिच परिसराची ओळख 'मिनी पाकिस्तान' करुन दिल्याने वाद निर्माण झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. 30 - तृणमूल काँग्रसचे पश्चिम बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी गार्डन रिच परिसराची ओळख 'मिनी पाकिस्तान' करुन दिल्याने वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द डॉन'च्या पत्रकाराला मुलाखत देताना त्यांनी गार्डन रिच परिसराची ओळख 'मिनी पाकिस्तान' अशी करुन दिली आहे. फिरहाद हकीम यांच्या वक्तव्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. फिरहाद हकीम स्वत: कोलकाता पोर्ट भागातून उमेदवार आहेत.
गार्डन रिच परिसरात प्रचारसभेत पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द डॉन'ची पत्रकार मलिहा हमीद सिद्दीकी सहभागी झाली होती. यावेळी 'चला तुम्हाला मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो' असं फिरहाद हकीम यांनी म्हटलं. फिरहाद हकीम यांचं हे वक्तव्य डॉन वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर टाकलं आहे. पाकिस्तानमध्ये सिद्दीकी यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं असून फेसबुकवर लाखो लाईक मिळाले आहेत.
पाकिस्तानमध्ये जरी फिरहाद हकीम यांचं कौतुक होतं असलं तरी ऐन निवडणुकीत फिरहाद हकीम यांनी विरोधकांच्या हाती मुद्दा दिला आहे. भाजपाने फिरहाद हकीम यांच्या वक्तव्यावर टीका केली असून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. फिरहाद हकीम यांनी आपली बाजू सावरत 'ऐन निवडणुकीत जातीय तणाव वाढण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं ' म्हटलं आहे. या मुद्यावर मी कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही. जर पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाऊ शकतात तर माझ्या वक्तव्याने इतका फरक का पडतो ? असं फिरहाद हकीम बोलले आहेत.