आश्चर्य! 20 व्या मजल्यावरून उडी मारल्यावर 'ही' उशी वाचवणार जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 10:28 AM2018-12-22T10:28:42+5:302018-12-22T11:10:40+5:30
कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला एक अनोखी उशी देण्यात आली आहे. आपात्कालीन परिस्थितीत 20 व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतरही या उशीमुळे अनेकांचे जीव वाचवता येणार आहेत.
कोलकाता - आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनेकदा इमारतीवरून उडी मारण्याची वेळ येते. मात्र असं केल्यास जीवाला धोका निर्माण होतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही कारण कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला एक अनोखी उशी देण्यात आली आहे. आपात्कालीन परिस्थितीत 20 व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतरही या उशीमुळे अनेकांचे जीव वाचवता येणार आहेत.
कोलकात्याच्या स्टीफन कोर्टात 9 वर्षांपूर्वी म्हणजेच मार्च 2010मध्ये लागलेल्या आगीत जीव वाचवण्यासाठी 9 जणांनी 50 फूटांवरून उडी मारली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच 2017 मध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीतून वाचण्यासाठीही दोन जणांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यामुळेच अशा आपात्कालीन घटनांमध्ये या उशीमुळे आता अनेकांचे जीव वाचवणे शक्य होणार आहे.
कोणत्याही ठिकाणी अगदी सहज वापर करता येईल अशाप्रकारे या उशीचे डिझाईन करण्यात आले आहे. अनकेदा आपात्कालीन स्थितीत शहरातील अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्यांमुळे त्या ठिकाणी अत्याधुनिक उपकरणं नेणं शक्य नसते. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करून कोलकाताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही उशी देण्यात आली आहे. एकावेळी चारजण या उशीच्या मदतीने उडी घेऊ शकतात. तसेच उशीला खाली येण्यासाठी केवळ 80 सेंकदाचा वेळ लागतो. उडी मारल्यावर उशीत हवा भरून ती 1.55 मीटर लांब, 1 मीटरची कडा, 8.5 आणि 6.5 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंच होते. या उशीला निळ्या रंगाची कडा असते. त्यामुळे उडी घेणाऱ्या व्यक्तीची भीती कमी होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकातातील अरुंद रस्त्यांमध्ये हायड्रोलिक शिड्या किंवा इतर अत्याधुनिक उपकरणे नेणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी या उशीची खूप मदत होणार आहे. या उशीच्या मदतीने दोनशे फूटावरून उडी मारल्यावर जीवितहानीची भीती नाही. तसेच जखमी होण्याची शक्यताही कमी आहे. उडी घेतल्यावर उशीचा आकार बदलतो. खाली येणारी व्यक्ती उतरल्यावर फक्त 20 सेंकदात उशी मूळ आकारात येते. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत कमी वेळेत अनेकदा या उशीचा वापर करणे शक्य होणार आहे. फक्त 10 मिनिटात 30 पेक्षा जास्त लोकांना वाचवणे या उशीमुळे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.