आरोग्य सेवा कोलमडणार? उद्या IMA चा देशव्यापी संप; कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:31 AM2024-08-16T10:31:18+5:302024-08-16T10:33:14+5:30
Kolkata rape-murder : आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
Kolkata rape-murder : नवी दिल्ली : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA)देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळं देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएनं एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, आयएमएनं म्हटलं आहे की, "कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील क्रूर घटना आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गुंडगिरीबाबत आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रविवार म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांच्या सेवा २४ तास बंद ठेवण्याची घोषणा केली."
"सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अपघातग्रस्तांवर उपचार केले जातील. नियमित ओपीडीच्या सेवा नाहीत आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. हा संप सर्व क्षेत्रांना लागू आहे, जेथे मॉडर्न मेडिसिन डॉक्टर आपल्या सेवा देत आहेत. डॉक्टरांच्या प्रश्नावर आयएमएला देशाच्या सहानुभूतीची गरज आहे", असंही एएनआयनं म्हटलं आहे.
आतापर्यंत १२ जणांना अटक
९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी पाच डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले होतं. तसंच, याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.