"ममता बॅनर्जी यांनी बलात्कार पीडितांचं रेट कार्ड बनवलंय, साक्षीदार खरेदी करतात"; वकिलाचा गंभीर आरोपो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 03:38 PM2024-08-19T15:38:26+5:302024-08-19T16:05:21+5:30
कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्काराच्या आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर, आता बलात्कार पीडितेच्या वकिलाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...
कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्काराच्या आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर, आता बलात्कार पीडितेच्या वकिलाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बलात्कार पीडितांचे रेट कार्ड निश्चित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, पीडितेच्या पालकांनीही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 'डबल स्टँडर्ड' असल्याचा आरोप केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
एएनआया सोबत बोलताना पीडितेचे वकील विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत निंदनीय आहे. जेव्हा केव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यांना लगेचच पीडितेच्या कुटुंबीयांसोबत बोलायचे असते, त्या त्यांना पैसे देतात आणि संर्व संपले आहे असे सांगतात. दुर्दैवाने त्यांनी बलात्कार पीडितांसाठी रेट कार्ड निश्चित केले आहे... त्या साक्षीदार विकत घेण्याचा प्रयत्न करतात."
काय म्हणाले पीडितेचे वडील? -
पीडितेचे वडील रविवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री मोठ मोठ्या गप्पा मारत आहेत, माझ्या मुलीसाठी न्याय मागत रस्त्यांवरून चालत आहेत. याच वेळी त्या, जनतेचा रोष कमी करण्याचाही प्रयत्न करतात. त्या अशा दुटप्पी कामात का सहभागी आहे? त्यांना लोकांची भीती वाटत आहे का? आमच्याकडे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आवश्यक आहेत."
पश्चिम बंगाल सुरक्षित नाही - राज्यपाल
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस सोमवारी म्हणाले, "बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. बंगालने महिलांना निराश केले आहे. समाजाने नाही, तर विद्यमान सरकारने महिलांना निराश केले आहे. बंगालने आपला गौरव पुन्हा एकदा मिळवायला हवा. जेथे महिलांचा सन्मान होईल."