Kolkata RG Kar Case: "पोलिस प्रकरण दडपत आहेत, आमच्या मुलीचा मृतदेह...", कोलकाता प्रकरणात पीडितेच्या वडिलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 09:50 AM2024-09-05T09:50:13+5:302024-09-05T09:54:12+5:30
Kolkata RG Kar lady doctor murder case: "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने लाच देण्याचा प्रयत्न केला, पोलिस स्टेशनमध्ये तासन्तास बसवून ठेवण्यात आलं"
Kolkata RG Kar lady doctor rape and murder case: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण अजूनही चर्चेत आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्याने निदर्शने सुरू आहेत. याच दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता पोलिसांनी आमच्या मुलीच्या मृतदेहावर घाईघाईने वैद्यकीय कारवाई केली आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे. तसेच कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पीडितेचे वडील म्हणाले, "कोलकाता पोलिस सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह पाहण्याची परवानगीही देण्यात आली नाही. तासनतास पोलिस स्टेशनमध्ये ताटकळत बसवून ठेवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला. जेव्हा यात काहीतरी गोंधळ आहे हे आमच्या लक्षात आले तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र नकार दिला."
१० ऑगस्टपासून बंगालमध्ये निदर्शने सुरू आहेत. पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी विविध क्षेत्रातील लोक करत आहेत. या प्रकरणाला गती मिळाल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ९ ऑगस्टच्या पहाटे कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर मद्यधुंद आरोपी संजय रॉय याच इमारतीत झोपला होता, त्याला पोलिसांनी नंतर अटक केली आणि सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.