Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:18 AM2024-09-20T11:18:45+5:302024-09-20T11:25:51+5:30
Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआयला आपल्या मुलीच्या कॉल रेकॉर्डचे "सुरक्षित" ठेवण्याची विनंती केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सीबीआयला सांगितलं की, "आपण आपल्या मुलीशी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी फोनवर बोललो होतो."
सीबीआयला लिहिलेल्या पत्रात, वडिलांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, विशेषत: सेमिनार हॉलच्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज, जिथे ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता, ते सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच सीबीआयच्या सूत्राने सांगितलं की, वडिलांनी आम्हाला पत्र लिहून कॉल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे.
अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील बलात्कार-हत्या प्रकरणातील त्यांच्या चौकशीच्या स्टेटस रिपोर्टसह हे पत्र १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलं होतं. आपल्या दोन पानी पत्रात डॉक्टरच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूच्या तपासाबाबत आपली असहायता आणि चिंता व्यक्त केली आहे.
ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआय अधिकाऱ्यांना ड्युटी चार्ट जप्त करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून ८ ऑगस्टच्या रात्री आपल्या मुलीसोबत कोण ड्युटीवर होतं? हे कळू शकेल. या गुन्ह्यात रुग्णालयातील अनेक इंटर्न आणि डॉक्टरांचा सहभाग असू शकतो, असंही पालकांनी सीबीआयला सांगितलं.
९ ऑगस्ट रोजी, सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरचा मृतदेह सापडल्याच्या एका दिवसानंतर, कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधात संजय रॉयला अटक केली. १३ ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्याच दिवसापासून सीबीआयने तपास सुरू केला.