नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 02:37 PM2024-08-28T14:37:10+5:302024-08-28T14:39:18+5:30

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

kolkata rg kar rape murder case mamata banerjee we bring new law trial end 10 days justice bjp  | नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी

नवा कायदा आणणार, १० दिवसांत बलात्कार पीडितांना न्याय मिळेल - ममता बॅनर्जी

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा, यासाठी कोलकाता येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 

या आंदोलनाला 'नबन्ना प्रोटेस्ट' असं नाव देण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या कारवाईच्या विरोधात भाजपने आज  बंगाल बंदची हाक दिली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपला न्याय नको आहे, ते फक्त बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, आम्ही असा कायदा आणू, ज्यामध्ये १० दिवसांत खटला संपेल, असेही त्या म्हणाल्या. 

बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, आम्ही पुढील आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवू. पश्चिम बंगालमध्ये बलात्कार पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही एक नवीन कायदा आणू, जिथे फक्त १० दिवसांत केस संपेल. हा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राज्यपालांनी तो मंजूर न केल्यास आम्ही राजभवनासमोर आंदोलनही करणार आहेत, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आज भाजपने पुकारलेल्या १२ तासांच्या 'बंगाल बंद'बाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही आजचा दिवस आरजी कर डॉक्टरसाठी समर्पित केला आहे. आम्हाला याप्रकरणी न्याय हवा आहे, पण भाजपने आज बंदची हाक दिली आहे. त्यांना न्याय नको आहे, ते फक्त बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली. 

याचबरोबर, आम्ही हा दिवस अशांना समर्पित करत आहोत, ज्यांनी यातना सहन केल्या. मृतदेहांचे राजकारण करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक बंद पुकारला आहे. ते डॉक्टरांचा विरोध वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांचा निषेध करते. भाजपच्या लोकांनी बस पेटवून दिली आणि पोलिसांवर अमानुष हल्ला केला. रेल्वे सेवाही विस्कळीत केली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

पंतप्रधानांच्या विरोधात भाजपने बंद ठेवला पाहिजे - ममता बॅनर्जी
आम्ही या बंदला पाठिंबा देत नाही. भाजपने कधीही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अगदी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. भाजप खूप अत्याचारी आहे, भाजप अत्याचाराने भरलेला आहे. भाजपने पंतप्रधानांच्या विरोधात बंद ठेवला पाहिजे. उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील घटनांची पंतप्रधानांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. आम्ही कालचे (नबन्ना प्रोटेस्ट रॅली) फोटो पाहिले, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल मी पोलिसांना सलाम करते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
 

Web Title: kolkata rg kar rape murder case mamata banerjee we bring new law trial end 10 days justice bjp 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.