कोंडी फुटेना; मोदी अन्सारींना भेटले
By admin | Published: December 18, 2015 02:08 AM2015-12-18T02:08:58+5:302015-12-18T02:08:58+5:30
राज्यसभेतील पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राज्यसभेतील पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची त्यांच्या कक्षात भेट घेऊन चर्चा करताना गेल्या दहा दिवसांपासून या सभागृहाचे कामकाज ठप्प पडल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
मोदींनी थेट डॉ. अन्सारी यांच्याशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधकांनी गुरुवारी गदारोळ घालत कामकाज बंद पाडल्यानंतर लगेच मोदींनी अन्सारींच्या कक्षात धाव घेतली. उर्वरित चार दिवस कामकाज सुरळीत चालावे यासाठी राज्यसभेत व्हीप जारी करावा यासाठी सरकारने अन्सारींकडे आग्रह धरला आहे. सभागृहातील हौदात धाव घेत वारंवार सभागृहाचे कामकाज बंद पडणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी असेही सरकारला वाटते.
हा चुकीचा पायंडा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना विरोधकांना चांगलेच खडसावले होते. भविष्यात विरोधकांसाठी चुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य बनविले. संसदीय कामकाज दिवसेंदिवस अवघड होत असल्याने यापुढे भविष्यातील निर्णय प्रशासनाकडे जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
हिटलिस्टवर ४० खासदार...
राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कामकाजाचा खोळंबा करणाऱ्या ४० पेक्षा जास्त खासदारांची नावे समाविष्ट आहेत. काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेतही हौदात धाव घेण्याचे प्रकार चालविले असले तरी, लोकसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्यसभेत सभापतींना कोणतेही कामकाज पार पाडणे अवघड झाले आहे.
गुरुवारीही मोदी राज्यसभेत उपस्थित असताना काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पीठासीन अधिकाऱ्यांनी कर्तव्याचा भाग पाहून कामकाज पार पाडावे . गोंधळी खासदारांवर कारवाई करावी, अशी सरकारची इच्छा आहे.