कोरियाचा झुंजार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 12:53 AM2016-10-14T00:53:56+5:302016-10-14T00:53:56+5:30
भल्यामोठ्या पिछाडीवर पडल्यानंतरही झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना कोरियाने जँग कुन लीच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर विश्वचषक कबड्डी
अहमदाबाद : भल्यामोठ्या पिछाडीवर पडल्यानंतरही झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना कोरियाने जँग कुन लीच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर विश्वचषक कबड्डी स्पर्धेत बांगलादेशच्या हातातून ३५-३१ असा सामना खेचून आणला. दरम्यान, या रोमांचक विजयासह कोरियाने ‘अ’ गटात विजयी हॅट्ट्रिक नोंदवताना १५ गुणांसह आपले अग्रस्थान भक्कम केले आहे.
गटविजेतेपद निश्चित करण्यासाठी भारताला या सामन्यात बांगलादेशच्या विजयाची अपेक्षा होती. विशेष म्हणजे बांगलादेशनेही आक्रमक सुरुवात करताना कोरियावर १०-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर कोरियाने केवळ पुनरागमन न करता संपुर्ण सामन्याचे चित्रच पालटले. सहाव्याच मिनिटाला कोरियाला लोण चढवलेल्या बांगलादेशला सुरुवातीला वर्चस्व गाजवल्यानंतरही सामना गमवावा लागला. सलग १२ गुणांचा धडाका लावत कोरियाने १३-१३ अशी बरोबरी साधली.
यानंतर सामना बरोबरीत रंगला आणि मध्यंतराला कोरियाने १५-१३ अशी आघाडी घेत जबरदस्त पुनरागमन केले. यावेळी दडपणाखाली आलेल्या बांगलादेशच्या चुकांचा फायदा कोरियाने घेतला. तर कुन ली याने जबरदस्त धुमाकूळ घालताना आक्रमणात १२ आणि बचावात ३ असे एकूण १५ गुणांची कमाई करुन बांगलादेशला लोळवले. तर, ताई बेओम किम, डाँग जीआॅन ली आणि ताई डीओक एओम यांनी प्रत्येकी ४ गुणांसह लीला चांगली साथ दिली.
बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझ्झामन मुन्शी याने खोलवर आक्रमण करताना सर्वाधिक ८ गुण वसूल केले. झीऔर रेहमान यानेही ७ गुणांसह चांगला खेळ केला. तुफानी सुरुवात करुन सामन्यावर मजबूत नियंत्रण मिळवल्यानंतरही बांगलादेशला विजय मिळवण्यात अपयश आले. स्पर्धेच्या सलामीलाच बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताला नमवलेल्या कोरियाने या दिमाखदार विजयासह यजमानांविरुद्ध मिळवलेला विजय फ्ल्यूक नसल्याचे सिध्द केले.
तत्पूर्वी झालेल्या अत्यंत एकतर्फी सामन्यात सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम राखून थायलंडने ‘ब’ गटात केनियाचा ५३-२१ असा फडशा पाडला. (वृत्तसंस्था)