Shivdeep Lande : कडक सॅल्यूट! महिला कॉन्स्टेबल, हवालदाराला दिला उद्घाटनाचा मान; IPS शिवदीप लांडेंचा दिलदारपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:23 AM2022-06-13T09:23:47+5:302022-06-13T09:38:38+5:30
IPS Shivdeep Lande : शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदाराला दिला.
नवी दिल्ली - आयपीएस अधिकारी हे आपल्या काम करण्याच्या अनोख्या अंदाजामुळे ओळखले जातात. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande). लांडे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक गुन्हेगार त्यांचं नाव ऐकताच थरथर कापतात. सध्या ते बिहार केडरचे पोलीस अधिकारी आहेत. लांडे सध्या कोसीचे डीआयजी आहेत. सहरसामध्ये पोलीस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवदीप लांडे यांचा दिलदारपणा पाहायला मिळाला आहे.
शिवदीप लांडे सहरसामध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह या देखील होत्या. पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याची वेळ आली तेव्हा शिवदीप लांडे यांच्या कृतीमुळे सर्व जण भारावले. शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदाराला दिला. पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि चौकीदार मोहम्मद कबीर आलम यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व पाहून उपस्थित इतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.
पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान आपल्या खात्यातील सामान्य कर्मचाऱ्यांना दिल्याने पोलीस कर्मचारी भारावून गेले. शिवदीप लांडे मोठ्या मनाचे आहेत. यांनी दिलेला सन्मान आजपर्यंत इतर कुणी दिला नव्हता, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. तसेच पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान मिळेल अस कधीचं वाटलं नव्हतं. डीआयजी साहेबांचे आभार मानते, हे एका स्वप्नापेक्षाही कमी नाही, असं म्हटलं आहे.
मोहम्मद कबीर आलम य़ांनी देखील लांडे साहेबांनी मला मान दिला ही मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. शिवदीप लांडे पाच वर्षांनी बिहार केडरमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. सध्या ते कोसीचे डीआयजी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंगेर, सहरसा, रोहतास, पाटणामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. आरोपी विरोधातील कठोर कारवाईसाठी ते लोकप्रिय आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.