पालीची दहशत! 'तिला' पाहताच कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम; भीतीने सोडलं ऑफिस मग झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 02:03 PM2021-10-28T14:03:01+5:302021-10-28T14:06:09+5:30
Wild Goira Lizard : एका पालीच्या भीतीने संपूर्ण ऑफिस रिकामं झालं आहे.
नवी दिल्ली - अजगर, साप, मगर पाहिल्यावर सर्वांचीच घाबरगुंडी उडते. पण काहींना पालीची देखील भीती वाटते. अनेक जण पाल समोर दिसताच जोरजोरात ओरडतात, तिच्यापासून दूरही पळतात. पण एका पालीमुळे ऑफिसमधील सर्वच्या सर्व कर्मचारी पळाल्याचं कोणी सांगितलं तर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका पालीच्या भीतीने संपूर्ण ऑफिस रिकामं झालं आहे. राजस्थानच्या कोटा शहरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा जंक्शनच्या रेल्वे पोस्ट विभाग कार्यालयात मंगळवारी अचानक एक जंगली पाल घुसली आणि खळबळ उडाली. तिला पाहताच कर्मचाऱ्यांना घाम फुटला. भीतीने कर्मचाऱ्यांनी काम बाजूला ठेवलं. काम सोडून ते ऑफिसमधून बाहेर पळाले. त्यानंतर अखेर पालीला पकडण्यासाठी स्नेक कॅचरला बोलवण्याच आलं. स्नेक कॅचर तिथं आले आणि त्यांनी त्या पालीला पकडलं. तेव्हा कुठे कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव आला. या पालीला सुरक्षितपणे जंगलात पुन्हा सोडण्यात आलं.
"ही पाल जंगली आहे पण विषारी नाही"
ऑफिसमध्ये शिरलेली पाल जंगली पाल होती. जवळपास 12 इंच लांबीची ही पाल होती. त्यामुळे तिचं रूप, आकार पाहूनच सर्वांना मोठा धक्का बसला आणि ते घाबरले. स्नेक कॅचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पाल जंगली आहे पण विषारी नाही. ती खूपच शांत असते, तिला घाबरण्याचं तसं काही कारण नाही. जंगली पालीमुळे दहशत पसरल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. स्नेक कॅचर गोविंद शर्मा यांनी सांगितलं की, ही जंगली मेल गोयरा पाल आहे.
"पालीला घाबरू नका आणि तिला मारूही नका"
गोयरा पाल ही विषारी नसते. तिच्यात फक्त बॅक्टेरिया असतात. ही उंदीर आणि बेडुक खाते. खराब मांस खाऊन ती आपलं पोट भरते. कारणाशिवाय ती कोणालाच हानी पोहोचवत नाही. ती चावली तर त्या भागावर जखम होते. त्यामुळे इन्फेक्शनही पसरू शकतं. पण तिच्या चावण्याने कोणाचा मृत्यू होत नाही. त्यामुळे अशा पालीला घाबरू नका आणि तिला मारूही नका असं गोविंद शर्मा यांनी म्हटलं आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.