कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला अटक
By admin | Published: December 28, 2016 11:47 AM2016-12-28T11:47:31+5:302016-12-28T11:47:31+5:30
हवाला व्यापा-यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमच
नवी दिल्ली, दि. 28 - हवाला व्यापा-यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील कस्तुरबा गांधी मार्गवर असलेल्या बँकेच्या शाखेतून मॅनेजरला अटक करण्यात आली. बँकेत बनावट खाती तयार करुन करोडोंचा व्यवहार केल्याचा आरोप मॅनेजरवर ठेवण्यात आला आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटकेची कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या बँक मॅनेजरचे हवाला व्यापारी पारसमल लोढा आणि रोहित टंडन यांच्याशी संबंध होते असं सांगितलं जात आहे. पारसमल लोढा कोलकातामधील मोठे उद्योजक असून 25 कोटींच्या नोटाबदली प्रकरणात त्यांना मुंबईत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीला नेण्यात आलं होतं. सध्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) बँक मॅनेजरची कसून चौकशी केली जात आहे.
कोटक महिंद्रा बँकेत आयकर विभागाने शुक्रवारी छापा टाकला होता. कोटक महिंद्राच्या कस्तुरबा गांधी शाखेत बनावट खाती तयार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. खात्यांमध्ये एकूण 70 कोटी रुपये सापडले होते, हे सर्व पैसे काळ्याचे पांढरे केल्याचा संशय होता. रमेश चांद आणि राज कुमार यांच्या नावे ही अकाऊंट होती. कोटक महिंद्राने मात्र आपल्या बँकेत कोणतीही बनावट खाती नसून या खातेधारकांनी केवायसी प्रक्रिया पुर्ण केल्याचा दावा केला होता.