कोझीकोड विमान अपघात : ६६० कोटींची भरपाई, देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:24 AM2020-10-30T04:24:45+5:302020-10-30T07:11:43+5:30
Kozhikode plane crash: सदर विमान अपघातात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानासाठी विमा कंपन्यांनी ८.९ कोटी डॉलर भरपाई जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : केरळमधील कोझीकोड विमानतळावर ७ ऑगस्ट रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बोइंग ७३७ विमानाला झालेल्या अपघातानंतर देश-विदेशांतील विमा कंपन्या संबंधितांना ६६० कोटी रुपयांची (८.९ कोटी डॉलर) भरपाई देणार आहेत. भारतीय हवाई वाहतुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेची भरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे.
सदर विमान अपघातात झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानासाठी विमा कंपन्यांनी ८.९ कोटी डॉलर भरपाई जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना किंवा जखमी व्यक्तींना ३.८ कोटी डॉलर भरपाई देण्यात येईल, तर अपघातग्रस्त विमान व इतर गोष्टींसाठी ५.१ कोटी डॉलरची भरपाई दिली जाईल.
न्यू इंडिया ॲॅश्युअरन्स (एनआयए) या विमा कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, कोळीकोड येथील अपघातानंतर न्यू इंडिया ॲॅश्युअरन्सकडून एअर इंडियाला नुकसानभरपाईपोटी ३७३.८३ कोटी रुपये देण्यात येतील. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात विमा कंपन्यांनी इतकी मोठी रक्कम नुकसानभरपाईपोटी याआधी कधीही दिलेली नाही.
दुबईहून आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझीकोड विमानतळावर झालेल्या अपघातात दोन वैमानिकांसह २१ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघातप्रकरणी विदेशातील जीआयसी आरईसह काही विमा कंपन्यांनी ७० लाख डॉलरची भरपाई दिली आहे.
काही महिन्यांनंतर मिळणार पैसे
कोझीकोड विमान अपघातातील प्रत्येक जखमी व्यक्ती, तसेच मृतांच्या वारसदारांना भरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महिने लागतील.
या दुर्घटनेत विमानाचे जे प्रचंड नुकसान झाले त्याबद्दलची योग्य कागदपत्रे आम्हाला मिळताच त्यानंतर दोन दिवसांच्या आत ही भरपाई केली जाईल, असे विमा कंपन्यांनी म्हटले आहे.