'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:27 IST2019-04-18T16:26:35+5:302019-04-18T16:27:19+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय.

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. तर नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकत्र येत आहे. महाआघाडीच्या रुपाने सत्ताधारी भाजपा आणि मित्रपक्षाला हरविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.
११ एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक गमतीदार किस्सेदेखील घडताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत घडत असलं तरी प्रत्यक्षात महाभारतातील पात्रे मतदानाच्या रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून येतं. आश्चर्य करु नका, ही पात्रे खरी नाहीत मात्र महाभारतातील नावे असलेले मतदार रांगेत उभं राहून मतदान करताना दिसतात. निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, या निवडणुकीत महाभारतातील पात्रांची नावं असलेल्या मतदारांची संख्या लाखोमध्ये आहे.
जवळपास ६.४४ लाख कृष्ण आपापल्या मतदारसंघात मतदान करणार आहेत. तर ३० लाख गीता घराच्याबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावणार आहेत. तसेच ९ लाख अर्जुनही मतदानाचा हक्क बजावत देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा भाग होणार आहेत. कर्णदेखील ईव्हीएम मशिनचं बटण दाबणार आहेत. तर महाभारतात हस्तिनापुराला जशीच्या तशी माहिती देणाऱ्या संजय नावाचे जवळपास २६ लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. तसेच ७५ धुतराष्ट्रही यादीत सहभागी आहेत.
शंतनु, भीष्म, विचित्रवीर्य यांच्यासोबत धुतराष्ट्र आणि पांडुदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन सरकार निवडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय मतदार यादीत शकुनी, शिखंडी, गांधारी आणि पुतना नावांचाही समावेश आहे. महाभारताचे निर्माते वेदव्यास यांच्या नावाचे १६८५ मतदार आहेत तर ३२६ शकुनी नावाचे मतदार आहेत. कुंती आणि द्रौपदी नावाच्या मतदारांचीही मतदार यादीत नावे आहेत. ज्या मातीमध्ये महाभारत घडलं त्या कुरुक्षेत्र मतदारसंघात ३७२२ कृष्ण, ३१ पार्थ आणि ३०२९ गीता आणि १५६९ संजय नावाचे मतदार आहेत.