कृष्णा-गोदावरीप्रमाणेच केन-बेतवाही जोडणार
By Admin | Published: September 28, 2015 02:19 AM2015-09-28T02:19:02+5:302015-09-28T02:19:02+5:30
महत्त्वांकाक्षी नद्याजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा-गोदावरीप्रमाणेच आता केन आणि बेतवा या नद्याही जोडल्या जाणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत केन-बेतवा जोडण्याच्या योजनेवर
नवी दिल्ली : महत्त्वांकाक्षी नद्याजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा-गोदावरीप्रमाणेच आता केन आणि बेतवा या नद्याही जोडल्या जाणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत केन-बेतवा जोडण्याच्या योजनेवर प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित आहे.
जलस्रोत व नदीविकास मंत्रालयाच्या योजनेनुरूप मध्य प्रदेश सरकारने केन-बेतवा नदी जोडण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. अलीकडे आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी नदी जोडली गेली. रविवारी जलस्रोत व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी याबाबत माहिती दिली. नदीजोड प्रकल्प मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत केन-बेतवा जोडण्याची योजना या वर्षअखेरीस सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्या. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत उत्तर प्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या क्षेत्रासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे.
मध्य प्रदेशच्या क्षेत्रात पन्ना राखीव व्याघ्र प्रकल्प येत आहे आणि त्यामुळे अद्याप वन व पर्यावरण तसेच वन्यजीव विभागाची परवानगी मिळालेली नाही. तथापि, मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने ही मंजुरी मिळण्याच्या दिशेने गंभीर प्रयत्न सुरू केले आहेत.