"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 02:05 PM2023-01-22T14:05:27+5:302023-01-22T14:08:57+5:30
कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे.
Controversial statement on Lord Rama: प्रसिद्ध कन्नड लेखक आणि तर्कवादी के.एस.भगवान यांनी श्रीराम आणि माता सीतेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ''वाल्मिकी रामायणनुसार, भगवान राम दररोज दुपारी पत्नी सीतेसोबत बसून दारू प्यायचे. राम सीतेला जंगलात पाठवायचा, पत्नीची कधीच काळजी घेतली नाही'', असे वादग्रस्त विधान के.एस. भगवान यांनी केलं आहे. ते 20 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकातील मंड्या येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
'राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'
के.एस. भगवान म्हणाले, ''सध्या रामराज्य बनवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचून लक्षात येईल की, राम आदर्श नव्हते. त्यांनी 11,000 वर्षे नाही तर केवळ 11 वर्षे राज्य केलंय. राम दररोज दुपारी सीतेसोबत बसायचे दारू प्यायचे. ते पत्नी सीतेला जंगलात पाठवायचे आणि कधीच तिची काळजी घेतली नाही. रामाने झाडाखाली बसून तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा शीरच्छेद केला. राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'' असे विधान केले आहे.
के.एस. भगवान यांना तुरुंगात टाकण्याची भाजपची मागणी
केएस भगवान यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. भाजप नेते विवेक रेड्डी यांनी सरकारकडे लेखकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विवेक म्हणाले- "हा अत्यंत अश्लील आणि घृणास्पद प्रकारचा हल्ला आहे. यातून के.एस. भगवान यांची गरीब मानसिकता दिसून येते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. हे इतर देशात बोलले असते, तर त्यांची काय अवस्था झाली असती. भारत खूप सहनशील आहे. आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करू शकत नाही." असे ते म्हणाले.
याआधीही रामावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे
भगवान राम यांच्याबाबत केएस भगवान यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांनी दावा केला होता की, ''प्रभू राम नियमितपणे दारू पितात आणि त्यांनी सीतेलाही दारू पाजली होती.'' त्यांनी त्यांच्या 'राम मंदिर याके वेद' या पुस्तकातही याबद्दल लिहिले आहे. त्यांनी त्या पुस्तकात रामायणाविषयी असे काही शब्द लिहिले होते, जे वादग्रस्त ठरले. हे प्रकरण इतके वाढले की सरकारला त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवावा लागला. याशिवाय, 2015 मध्ये केएस भगवानने हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेची काही पाने जाळणार असल्याचे म्हटले होते. यानंतर पोलिसांनी लेखकावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.