कुलभूषण जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:41 AM2019-09-03T05:41:46+5:302019-09-03T05:42:06+5:30
राजनैतिक संपर्कानंतर भारताचे मत
नवी दिल्ली : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याकडून पाकिस्तान त्यांच्यावरील धादांत खोटे आरोप खरे असल्याची कबुली पढविलेल्या पोपटाप्रमाणे वदवून घेत असल्याने जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे जाणवले, असे भारताने सोमवारी ठामपणे नमूद केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलैमध्ये दिलेल्या आदेशानुसार जाधव यांना सोमवारी ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ (स्वदेशाच्या राजनैतिक अधिकाºयाशी भेट) उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने रविवारी रात्री ऐनवेळी दिला. तो स्वीकारून भारताचे इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयाचे प्रभारी गौरव अहलुवालिया यांनी जाधव यांची भेट घेतली. यानंतर काही तासांतच दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या भेटीविषयी भारताचे म्हणणे मांडले. ही भेट एका तुरुंगात झाली.
खटला हा फार्स होता
जाधव यांना ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ न देता त्यांच्यावर चालविलेला खटला हा निव्वळ फार्स होता, हे भारताचे म्हणणे मान्य करूनच न्यायालयाने ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’चा आदेश दिला होता. रवीश कुमार म्हणाले की, जाधव यांच्यावरील खटला व त्यांना दिलेली शिक्षा यांचा पाकिस्तानने परिणामकारक फेरविचार करावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ हा यातील प्राथमिक भाग आहे व त्याने पाकिस्तानची जबाबदारी संपत नाही.