कुलभूषण जाधव यांची पुन्हा नाकारली भेट, पाकचा आठमुठेपणा कायम
By admin | Published: April 18, 2017 11:05 AM2017-04-18T11:05:11+5:302017-04-18T11:16:00+5:30
कुलभूषण जाधव यांचा बचाव करण्यासाठी भारताकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आडमुठी भूमिका घेण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 18 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेऊ देण्याची मागणी पाकिस्तानने पुन्हा एकदा धुडकावली आहे. भारतीय वकिलातीमधील अधिका-यांना जाधव यांची भेट घेऊ दिली जाणार नाही, असा आडमुठेपणा पाकिस्तानी लष्कराने कायम ठेवला आहे.
कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवत पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांचा बचाव करण्यासाठी भारताकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र जाधव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा नकार दिला आहे. जाधव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं आतापर्यंत 13 वेळा प्रयत्न केले आहेत. मात्र पाकिस्तानच्या उद्दाम भूमिकेमुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधल यांच्यावर हेरगिरीचा आरोप करत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यावर पाकिस्तानानं सुनावलेली शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे खडेबोलही भारताने पाकला सुनावले आहेत.
दरम्यान, "कायदेशीर बाबीनुसार जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप असल्यानं आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत पुरवली जाऊ शकत नाही. पुराव्यांद्वारे जाधव पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे दिसले. यामुळे त्यांना शिक्षा देणे हे पाक लष्कराची जबाबदारी आहे. या प्रकरणात आम्ही कोणतीही तडजोड न करता जाधव यांना शिक्षा सुनावली आहे", असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली.
"ट्रायलदरम्यान जाधव यांच्यासंबंधी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. या निर्णयाविरोधात जाधव सुप्रीम कोर्टात आपली याचिका दाखल करू शकतात. मात्र प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी लष्कर त्याचा विरोधच करणार", असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत याला मान्यता मिळू शकते, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
भारताकडून ऑर्डर कॉपीसहीत जाधव यांच्या भेटीची मागणी
इस्लामाबाद येथे 14 एप्रिल रोजी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीना जंजुआ यांची भेट घेतली. यावर बंबावले यांनी सांगितले की, "जाधव यांची भेट घेण्यासाठी आम्ही पाकिस्तानकडे 13 वेळा केलेली विनंती त्यांनी फेटाळून लावली. आम्ही पुन्हा एकदा पाकचे परराष्ट्र सचिव यांच्याकडे जाधव भेटीबाबत विनंती केली आहे, जेणेकरुन आम्ही या प्रकरणात अपील करू शकतो. मात्र जोपर्यंत चार्जशीट आणि निर्णयाची प्रत मिळू शकत नाही तोपर्यंत जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करू शकत नाही".
दरम्यान, 60 दिवसांच्या आत शिक्षेविरोधात अपील करण्याची मुदत पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना देण्यात आली आहे.
जाधव यांचा खटला न लढण्याची वकिलांना धमकी
कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटले आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी ही माहिती दिली आहे. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केले आहे.
""जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रय़त्न करत आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी"" अशी मागणी सईद यांनी केली.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.