कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 09:44 AM2017-12-26T09:44:23+5:302017-12-26T12:37:03+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांची आई व पत्नी भारतात परतल्या आहेत.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांची आई व पत्नी भारतात परतल्या आहेत. भारतात परतल्यानंतर मंगळवारी(26 डिसेंबर) त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कुलभूषण जाधव यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका जाधव यांची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत बैठक सुरू झाली. यावेळी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमारदेखील सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
Foreign Secretary S Jaishankar and MEA spokesperson Raveesh Kumar at the residence of External Affairs Minister Sushma Swaraj in Delhi pic.twitter.com/C5MCnuUz6Z
— ANI (@ANI) December 26, 2017
Mother and wife of #KulbhushanJadhav leave from residence of EAM Sushma Swaraj in Delhi pic.twitter.com/FFWIb4HcvJ
— ANI (@ANI) December 26, 2017
पाकिस्तानात काय घडले 25 डिसेंबरला ?
हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी चेतना व आई अवंतिका यांनी सोमवारी (25 डिसेंबर) येथे काचेआडून भेट घेतली. अटक झाल्यापासून 21 महिन्यांत जाधव यांना कुटुंबीयांनी भेटण्याची ही पहिलीच वेळ होती.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीमधील एका खोलीत झालेली ही भेट म्हणजे एका परीने तोंडदेखला सोपस्कार ठरला. कारण जाधव यांना पत्नी व आईला प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. एका काचेच्या तावदानाआडून इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांना परस्परांशी संवाद साधता आला. काचेतून ते एकमेकांना पाहू शकत होते. परंतु जाधव यांना ज्या खोलीत बसविले होते ती काचेच्या तावदानाच्या पार्टिशनने सीलबंद केलेली होती. त्यामुळे बोलणे व ऐकणे फक्त इंटरकॉमवरूनच शक्य होते.
सुमारे 35 मिनिटे झालेली ही भेट संपल्यावर पाकिस्तान सरकारने तिचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यातील आवाज (ऑडिओ) बंद करून ठेवलेला होता. त्यामुळे भेटीत जाधव माय-लेकाचे व पती-पत्नीचे काय बोलणे झाले हे समजू शकले नाही. अर्थात पाकिस्तानने या भेटीची व्यवस्था ज्या पद्धतीने केली होती ती पाहता या तिघांचे इंटरकॉमवरून सुरु असलेले बोलणे त्याच वेळी (चोरून) ऐकण्याची व ते रेकॉर्ड करण्याची तजवीजही केली गेली असणार हे उघड आहे. हे बोलणे मराठीतून झाले असावे असे गृहित धरले तरी एखाद्या देशाच्या सरकारला कोणत्याही भाषेचे दुभाषे मिळणे हल्लीच्या जमान्यात कठीण नाही. भारताचे इस्लामाबादमधील उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना हजर राहू दिले जाईल, असे पाकिस्तानने आधी सांगितले होते.
परंतु भेटीच्या व्हिडिओमध्ये ते कुठे दिसले नाहीत. यावरून कदाचित त्यांना खोलीबाहेर उपस्थित राहू दिले गेले असावे असे वाटते. एखादे ‘हाय सेक्युरिटी इव्हेन्ट’ मानून कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली गेली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीकडे येणा-या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करून आसपासच्या इमारतींवर नेमबाज बंदूकधारी जवान तैनात केले गेले होते. माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या ओबी व्हॅन्सही दूर अंतरावर रोखण्यात आल्या. जाधव यांची पत्नी व आई आधी भारतीय उच्चायोगात गेल्या व तेथून त्या भेटीच्या ठिकाणी आल्या.
भेटीनंतर लगेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाकिस्तानचे संस्थापक काईदे-आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या जन्मदिनाचे पावित्र्य राखत शुद्ध मानवतावादी दृष्टिकोनातून ही भेट घडवून आणल्याची फुशारकी मारली. जाधव प्रकरणाचे पाकधार्जिणे असे सवंग व एकतर्फी कथानक सांगून त्यांनी ‘जाधव हे भारतीय दहशतवादाचा चेहरा’ असल्याची गरळ ओकली.
थेट भेटू न देता काचेआडून भेट का घडविली, असे विचारता डॉ. फैजल त्याचे समर्थन करत म्हणाले की, काही झाले तरी जाधव हे फाशीची शिक्षा झालेले कैदी आहेत. त्यांना भेटायला आलेल्या आमच्या पाहुण्या होत्या. त्यामुळे सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणे ही आमची जबाबदारी होती. भेट अशा प्रकारे होईल याची या दोघींना आधीच कल्पना देण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. पुन्हा केव्हा भेटू देणार, असे विचारता त्यांनी, आजची भेट शेवटची नाही, हे आवर्जून सांगितले. या पत्रकार परिषदेत जाधव यांचे दोन व्हिडीओही दाखविले गेले. त्यातील एक त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा होता. दुसरा व्हिडिओ सोमवारच्या भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले. ‘पत्नी व आईला भेटू देण्याची मी विनंती केली. ती मोठ्या मनाने मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचा आभारी आहे’, असे जाधव म्हणत असताना त्यात दाखविले गेले.
- दोन वर्षांनंतर मुलाला भेटणा-या आईच्या मनाची स्वाभाविक घालमेल लक्षात घेऊन खरे तर दोघांची प्रेमाने गळाभेट होऊ द्यायला हवी होती. परंतु तसे न करून पाकिस्तानने मनाचा कद्रुपणा दाखवत भेट घडविण्याचा केवळ देखावा केला हे निषेधार्ह आहे. - तुळशीदास पवार, कुलभूषण यांचे बालमित्र
कॉन्स्युलर अॅसेसचा वाद
भारताने वारंवार मागणी करूनही पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अॅसेस’ (राजनैतिक अधिका-याशी भेट) दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील प्रकरणात भारताने तोच मुद्दा प्रामुख्याने मांडला. भारताच्या उप उच्चायुक्तांना कुटुंबभेटीच्या वेळी हजर राहू देणे हा ‘कॉन्स्युलर अॅसेस’च आहे, या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या रविवारच्या विधानाने काही काळ वाद व संभ्रम निर्माण झाला. परंतु पत्रकार परिषदेत प्रवक्त्याने हा ‘कॉन्स्युलर अॅसेस’ नसल्याचे मान्य केले व तो केव्हा द्यायचा हे योग्य वेळी ठरविले जाईल, असे सांगितले.
थकवा, सचिंत चेहरे
व्हिडीओमधील चित्रे चार कॅमे-यांनी टिपलेली होती. त्यात नेव्ही ब्ल्यू रंगाचा कोट घातलेले जाधव व अंगावर शाल पांघरलेली त्यांची पत्नी व आई हे चेह-याच्या बाजूने आलटून-पालटून दिसत होते. जाधव यांचा चेहरा थकलेला व ओढग्रस्त दिसत होता तर आई व पत्नीच्या भावमुद्रा चिंता आणि काळजीच्या होत्या. नंतर दाखविलेला जाधव यांचा आभाराचा व्हिडीओ भेटीनंतरचा असल्याचे सांगितले गेले; पण त्यात त्यांच्या अंगावर निळा कोट नव्हता. मुळात जाधव जिवंत आहेत की नाही याची शंका घेणा-यांना गप्प करणे हा व्हिडीओ दाखविण्याचा उद्देश होता. जाधव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, असे सांगत प्रवक्त्याने त्यांचा 22 डिसेंबरचा एक मेडिकल रिपोर्टही वाचून दाखविला.