कुलभूषणच्या आई, पत्नीला पाकने दिली विधवेची वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:24 AM2017-12-29T04:24:10+5:302017-12-29T04:24:19+5:30
नवी दिल्ली : कुलभूषण जाधवची आई व पत्नी अशा दोन सौभाग्यवतींना आपल्या मुलाची अन् पतीची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात गेल्या असताना मंगळसूत्र काढायला लावून, कपाळावरचे कुंकू पुसून पाकिस्तानने विधवेच्या स्वरूपात तुरुंगात सादर व्हायला लावले.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : कुलभूषण जाधवची आई व पत्नी अशा दोन सौभाग्यवतींना आपल्या मुलाची अन् पतीची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात गेल्या असताना मंगळसूत्र काढायला लावून, कपाळावरचे कुंकू पुसून पाकिस्तानने विधवेच्या स्वरूपात तुरुंगात सादर व्हायला लावले. कोणत्याही देशाकडून भारतीय स्त्रीच्या बेअदबीचा आणि अपमानाचा यापेक्षा अधिक अतिरेक काय असू शकेल? परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी अतिशय भावनावेगात पाकिस्तानी अधिका-यांची मुजोरी आणि उद्धटपणाचा संसदेच्या दोन्ही सभागृहांत पर्दाफाश करीत सदर घटनाक्रमाचे निवेदन सादर केले.
कुलभूषण भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत, या एका घटनेचा आधार घेत पाकिस्तानने त्यांच्याविरुद्ध हेरगिरीचा ठपका ठेवला. सैन्य न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मात्र या निकालाला स्थगिती दिली आहे, असे नमूद करीत सुषमा स्वराज म्हणाल्या, २२ महिन्यांनंतर आईची मुलाशी आणि पत्नीची पतीशी भावनात्मक भेट होणार होती. पाकिस्तानने मात्र या भेटीचा आपल्या सवंग प्रचारासाठी वापर करून घेतला. वस्तुत: उभय देशांत असा करार झाला होता की कुलभूषणच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी मीडियाला भेटू दिले जाणार नाही, मात्र या कराराचे पालन न करता दोन्ही महिलांवर खोट्या आरोपांचा भडिमार करीत पाक प्रसारमाध्यमांकडून जाणीवपूर्वक त्यांना अपमानित करण्यात आले.
सुरक्षा कारणांचे अवास्तव अवडंबर माजवीत पाकिस्तानी अधिका-यांनी दोन्ही महिलांना अंगावरील कपडे बदलायला भाग पाडले. साडी नेसणाºया आईला पाकिस्तानने सक्तीने सलवार कमीज नेसायला लावले. केवळ पत्नीचेच नव्हे तर आईचेही मंगळसूत्र बिंदी आणि बांगड्या काढून घेतल्या. सभागृहात माझ्याकडून चुकीचे निवेदन केले जाऊ नये यासाठी सकाळीच कुलभूषण यांच्या आईशी मी स्वत: बोलले आणि सारा घटनाक्रम पुन्हा एकदा समजावून घेतला. त्या वेळी त्या माउलीने मला सांगितले, ‘पाकिस्तानी अधिका-यांना मी विनंती करीत होते की मंगळसूत्र हे माझ्या सौभाग्याचे प्रतीक आहे, आजपर्यंत कधीच मी ते काढले नाही. कृपा करून आता ते मला काढायला लावू नका, तेव्हा अधिकारी म्हणाले, नाइलाज आहे.
वरच्यांचे आदेश असल्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. प्रत्यक्ष भेटीत विधवेच्या अवतारात आईला पाहिल्यावर काही अशुभ तर घडले नाही ना, अशी शंका आलेल्या कूलभूषणने विचारले, बाबा कसे आहेत? आई-मुलाला मराठी भाषेत बोलूही दिले नाही.
यापेक्षा अधिक अपमानाची परिसीमा काय असू शकेल, असा सवालही सुषमांनी आपल्या निवेदनाद्वारे उपस्थित केला.’
आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने हास्यास्पद पद्धतीने चालवलेल्या खटल्यात जाधवला ठोठावलेली मृत्युदंडाची शिक्षा थोपवण्यात भारताला यश आले आहे. या शिक्षेला तूर्त स्थगिती आहे. आता ठोस तर्कांच्या आधारे आंतरराष्ट्रीय न्यायालयातून जाधवला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, असे स्वराज शेवटी म्हणाल्या.
>जोड्यात खरोखर चीप होती तर ती दाखवली का नाही?
कुलभूषणच्या पत्नीच्या जोड्यांमध्ये म्हणे धातूची कोणती तरी वस्तू होती, जाधवच्या पत्नीचे जोडे त्यासाठी पाकिस्तानने ठेवून घेतले. मागितल्यानंतरही परत केले नाहीत. कधी म्हणतात की जोड्यात चीप होती, कधी म्हणतात की कॅमेरा होता. त्या जोड्यांमध्ये बॉम्ब होता असे कोणी म्हटले नाही, हे नशीबच म्हणावे लागेल. वस्तुत: हेच जोडे घालून जाधवच्या पत्नीने एअर इंडियाच्या विमानाने भारतातून दुबईत व तेथून एमिरेट्सच्या विमानाने इस्लामाबादपर्यंत प्रवास केला. या प्रवासात दोनदा सुरक्षा चाचणी झाली. त्यात कोणालाही रेकॉर्डर कॅमेरा अथवा चीप आढळली नाही. पाकिस्तानी मीडियाने या विषयावर प्रचंड तमाशा केला. जर खरोखर चीप होती तर मग ती दाखवली का नाही? पाकिस्तानच्या खोटेपणाचा यातही पर्दाफाश झाला आहे.
>पाकिस्तानने मानले पत्रकारांचे आभार
जाधव यांच्या आई आणि पत्नीला जी अपमानास्पद वागणूक देण्यात आली तो प्रकार पूर्वनियोजित होता आणि यात साथ देणाºया पत्रकारांचे नंतर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने आभार मानले, असा खुलासा डॉन या वृत्तपत्राचे पत्रकार हसन बेलाल झैदी यांनी केला आहे.
इंटरनेटवरील एका व्हिडीओत दिसत आहे की, कशा प्रकारे जाधव यांच्या आई आणि पत्नी यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. विमानतळावर पत्रकार त्यांना विचारत होते की, आपण अतिरेक्याची आई आहात.
आपल्याला कसे वाटत आहे? आपल्या मुलाने शेकडो पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे. आम्हाला उत्तर पाहिजे. आपण पळून का जात आहात, असे प्रश्न करत मीडियाने आई आणि पत्नी यांना त्रस्त केले.
130कोटी भारतीयांच्या माता-भगिनींचा अपमान
कुलभूषणची आई आणि पत्नीच्या सौभाग्याचा अपमान हा १३0 कोटी भारतीयांच्या माता-भगिनींचा अपमान आहे, असे नमूद करीत राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सुषमा स्वराजांच्या निवेदनाचे समर्थन केले.कुलभूषणची आपल्या
कुटुंबीयांशी भेट हा विषय
पाकने आपल्या मानवतावादी दृष्टिकोनाचा जगभर प्रचार घडवण्यासाठी केला, मात्र त्यात माणूसकीचा लवलेशही नव्हता.
पाक प्रसारमाध्यमांनी अपमानित केले
२२ महिन्यांनंतर आईची मुलाशी आणि पत्नीची पतीशी भावनात्मक भेट होणार होती. पाकिस्तानने मात्र या भेटीचा आपल्या सवंग प्रचारासाठी वापर करून घेतला. पाक प्रसारमाध्यमांकडून जाणीवपूर्वक त्यांना अपमानित करण्यात आले. - सुषमा स्वराज