पैसे उधार घेतले, तुटलेल्या हातगाडीवर विकले कुलचे; आता झाला लखपती, घेतलं 40 लाखांचं दुकान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 12:50 PM2023-05-11T12:50:37+5:302023-05-11T13:00:26+5:30
कुलचे बनवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मेहनतीने तब्बल 40 लाखांची कमाई करून आज दुमजली दुकान विकत घेतलं आहे.
माणसाची मेहनत कधीच वाया जात नाही असं म्हणतात. मेहनत आणि जिद्द असेल तर जगातील प्रत्येक कठीण काम करता येतं. याची अनेक उदाहरणेही आपल्यासमोर येत राहतात. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील भवानीगडमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. मित्राकडून पैसे उधार घेऊन एका तुटलेल्या हातगाडीवर एका तरुणाने कुलचे विकले. त्याने केवळ कुलच विकले नाही तर त्यातून भरपूर कमाई करून आज 40 लाखांचे दुमजली दुकान खरेदी करण्यात त्याला यश आले आहे.
पंजाबच्या 'बासू कुलचेवाला' हा सर्वच तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. बासू याच्या यशाची पंजाबमध्ये चर्चा रंगली आहे. 'बासू कुलचेवाला' या नावाने प्रसिद्ध असलेला बासू आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम आणि जिद्दीला देत आहेत. बासू म्हणतो की, सुरुवातीला हातगाडीला टायरपण नव्हते. त्यामुळे रस्त्यावर ही गाडी खेचून आणावी लागत होती. पण आज माझ्या यशाची गोष्ट शहरभर प्रसिद्ध होत आहे.
दुकानावर मोठ्या अक्षरात बासू कुलचे असं लिहिलं आहे. कुलचे बनवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मेहनतीने तब्बल 40 लाखांची कमाई करून आज दुमजली दुकान विकत घेतलं आहे. बासूचे वय 28 वर्षे आहे. बासूने म्हटलं की, कुलचा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागायचे ते मित्रांकडून पैसे उधार घ्यायचो. हिंमत हारलो नाही. हळूहळू मेहनतीने यश मिळवले. आज बासूने आपल्या मेहनतीने 40 लाखांचे दुकान विकत घेतले आहे, ज्याचा लूक एखाद्या आलिशान शोरूमसारखा दिसतो.
बासूच्या कुलचाची चव दूरवर प्रसिद्ध आहे. हे खाण्यासाठी लांबून लोक येतात. बासूकडे अनेक प्रकारचे कुलचे आहेत. यामध्ये चिप्स कुरकुरीत कुलचा, कुरकुरे कुलचा, लेमन कुलचा, पीनट कुलचा आणि आइस कुलचा यांचा समावेश आहे… कुलचांच्या विविधतेबद्दल बोलायचे तर, असे अनेक प्रकार आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.