Kulgam Encounter: १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मनसुबा; भारतीय सुरक्षा दलानं केला 'वॉण्टेड' दहशतवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:48 PM2021-08-13T12:48:24+5:302021-08-13T12:49:02+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) तुकडीवर गोळीबार झाला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) तुकडीवर गोळीबार झाला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान अलर्ट मोडवर होते. बीएसएपची तुकडी प्रवास करत असतानाच दोन दहशतवाद्यांनी एका मोठ्या इमारतीवरुन अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.
सुदैवानं यात एकही जवान जखमी झाला नाही. सुरक्षा दलानं तातडीनं संपूर्ण इमारतीला घेराव घातला आणि रात्रभर चाललेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात यश आलं. रात्रीच्या अंधारात शोध मोहिम राबवणं तसं कठीण होतं. त्यामुळे आज सकाळी जेव्हा शोध मोहिमेला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानचा दहशतवादी उस्मान ज्याचा गेल्या ६ महिन्यांपासून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह सापडला. याशिवाय घटनास्थळावरुन एके-४७, मॅगजीन आणि आरपीजी ७ रॉकेट लॉन्चर ग्रेनेड हस्तगत करण्यात आलं आहे.
घटनास्थळावर जप्त करण्यात आलेल्या दारुगोळ्यावरुन अंदाज येतो की दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. पण सुरक्षा दलानं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा घातपात टळला, असंही विजय कुमार म्हणाले. स्वातंत्र्य दिनापूर्वी मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. पण त्यावर आता पाणी फेरलं गेलं आहे. लवकरच राष्ट्रीय महामार्ग रहदारीसाठी सुरू करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
कुलागाम येथील चकमकीत एक दहशतवादी मारला गेला तर दुसरा पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. बीएसएफच्या तुकडीवर हल्ला केल्यानंतर या दहशतवाद्यांनी जवळच्याच एका इमारतीत घुसखोरी केली होती. या ठिकाणी रात्रभर गोळीबार सुरू होता. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचं नाव उस्मान होतं आणि तो लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी होता. उस्मान एक खतरनाक दहशतवादी होता आणि स्वातंत्र्य दिनी मोठा हल्ला करण्याची तयारी तो करत होता, असं विजय कुमार यांनी सांगितलं.