कुमार गंधर्वांच्या हरवलेल्या मुलाखती आल्या पुस्तकरूपात, एनसीपीएत रंगला ‘गंधर्वांचे देणे’चा सुरेल सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:12 PM2024-04-05T12:12:27+5:302024-04-05T12:12:43+5:30
Mumbai: बंदिश, ठुमरी, राग संगीत, आलापी अशा संगीताच्या विविध प्रांतात हुकमी मुशाफिरी करत त्यात नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक चिंतनाचा अनमोल ठेवा असलेल्या ‘गंधर्वांचे देणे’ या पुस्तकाचे एनसीपीए येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले.
मुंबई - बंदिश, ठुमरी, राग संगीत, आलापी अशा संगीताच्या विविध प्रांतात हुकमी मुशाफिरी करत त्यात नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक चिंतनाचा अनमोल ठेवा असलेल्या ‘गंधर्वांचे देणे’ या पुस्तकाचे एनसीपीए येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. या कार्यक्रमादरम्यान पं. सत्यशील देशपांडे, कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश कोमकली आणि विख्यात गायिका अश्विनी भिडे यांनी स्वरांचा साज चढवत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
१९८५ साली ग्रंथाली प्रकाशनाशी संबंधित कुमार केतकर, अरुण साधू, संजीव खांडेकर, वासंती मुजुमदार, अरुण मुजुमदार यांनी पं. कुमार गंधर्व यांची सहा दिवस आणि १३ तास मुलाखत घेतली होती. यामध्ये संगीतातील विविध विषयांवरील कुमारांचे चिंतन यावर त्यांना बोलते केले. मधल्या काळात या मुलाखतींचा ठेवा गहाळ झाला होता. चार वर्षांपूर्वी तो पुण्यातील एका व्यक्तीला सापडला व त्याने हा ठेवा ग्रंथालीच्या सुपूर्द केला. त्यावर आधारित या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. एकाअर्थी हे पुस्तक ‘गाणारे पुस्तक’ आहे. कारण या पुस्तकामध्ये एकूण ५४ क्यूआर कोड देण्यात आले असून, वाचकांना त्यातील मुलाखती व कुमारांच्या मैफली या क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला या पुस्तकातील काही आठवणींचे अभिवाचन चंद्रकांत काळे व माधवी पुरंदरे यांनी केले. पुस्तकाचे प्रकाशन, विख्यात शास्त्रीय संगीत गायिका अश्विनी भिडे, पं. सुरेश तळवळकर, पं. सत्यशील देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पुस्तकाचे संपादक अतुल देऊळगावकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, एनसीपीएचे मुख्य वित्तीय अधिकारी सिद्धार्थ देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
गौरी राग डोळे वटारून नसतो...
यावेळी कुमारांची आठवण सांगताना पं. सत्यशील देशपांडे म्हणाले की, मी एकदा गौरी या धीरगंभीर मानल्या जाणाऱ्या रागाचा रियाज करत होतो. केसरबाईंना मी गौरी राग गाताना डोळे वटारून तो गाताना पाहिले होते. मला वाटले, या रागाच्या गायनाला डोळे वटारण्याच्या अभिनिवेशाची गरज आहे. मी तसाच गात असताना कुमारांनी मला पाहिले व म्हणाले, संगीताकडे लक्ष दे. डोळे वटारले म्हणजे गायन गंभीर होते असे नाही.
स्वतःला विसरण्यासाठी मी संगीत करतो...
कुमार गंधर्व यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले विख्यात तबलावादक पं. सुरेश तळवळकर म्हणाले की, कुमारांसाठी संगीत हे जीवनसाध्य होते. ते म्हणायचे की, मी कोण आहे हे विसरण्यासाठी मी संगीत करतो. संगीतामध्ये प्रयोग करायचे असतात ही मोलाची शिकवण मला कुमारांनी दिली.