कुमार विश्वासांवरून महिला आयोगात जुंपली
By admin | Published: May 5, 2015 11:37 PM2015-05-05T23:37:21+5:302015-05-06T00:45:53+5:30
कथित अनैतिक संबंधांमुळे आपचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) एका महिला कार्यकर्त्यासोबत कथित अनैतिक संबंधांमुळे या पक्षाचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली.
कुमार विश्वास यांच्याविरुद्ध राजकीय कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप आयोगाच्या सदस्य जुही खान यांनी केला असून समन्स बजावण्याच्या निर्णयावर त्या अध्यक्ष बरखा सिंग यांच्यावर उखडल्या आहेत. आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिली. दुसरीकडे बरखा सिंग यांनी मात्र विश्वास आणि त्यांच्या पत्नीला समन्स बजावण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. विश्वास यांनी या समन्सची दखल घेतली नसल्याने त्यांना नव्याने नोटीस पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाने सोमवारी विश्वास व त्यांच्या पत्नीस समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते; परंतु ते आयोगाच्या कार्यालयात पोहोचलेच नाहीत. आपल्याला आयोगाची नोटीस मिळाली नसल्याचे विश्वास यांचे म्हणणे आहे. विश्वास यांच्यासोबत कथित अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या महिलेने न्यायासाठी दिल्ली महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. या आरोपांमुळे आपली प्रचंड बदनामी झाली असून वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे; परंतु विश्वास यांनी या अफवांचे अजूनही खंडन केलेले नाही, अशी या महिलेची तक्रार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)