लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे कुमार विश्वास गोत्यात
By admin | Published: May 4, 2015 02:45 PM2015-05-04T14:45:33+5:302015-05-04T14:51:59+5:30
आपच्या महिला कार्यकर्त्याने तक्रार केल्यावर दिल्लीच्या महिला आयोगाने डॉ. कुमार विश्वास यांना समन्स बजावल्याने आपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - आम आदमी पक्षाचा डोक्याचा ताप आणखी वाढला असून पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांच्याविरोधात पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या महिला आयोगाने विश्वास यांना समन्स बजावले आहे. विश्वास यांना मंगळवारी महिला आयोगासमोर हजर राहून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मला बदनाम करण्याचा हा कट आहे असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे.
आपच्या महिला कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. कुमार विश्वास यांच्यासोबत संबंध असल्याची अफवा पसरवण्यात आल्याने माझे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. आता कुमार विश्वास यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी असे या महिलेचे म्हणणे होते. या महिलेच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने कुमार विश्वास व त्यांच्या पत्नीला समन्स बजावत मंगळवारी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीतील आपच्या महिला कार्यकर्त्याचे कुमार विश्वास यांनी शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. पण संबंधीत महिलेनेच या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कुमार विश्वास यांनी या प्रकरणासाठी भाजपाला जबाबदार ठरवले आहे. मला बदनाम करण्यासाठी काही लोकं घाणेरडे राजकारण करत आहेत असे विश्वास यांनी म्हटले आहे.